पुणे
गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आर्थिक दुर्बल घटकांसह मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांसाठी महत्वाच्या ठरलेल्या देशातील पहिल्या राजीव गांधी ई – लर्निंग स्कुलने राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावीच्या निकालात यंदाही शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे माजी उपमहापौर आबा बागुल यांनी अभिनंदन केले आहे.
शाळेतील सर्व विद्यार्थी चांगले गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत.शिवराम नामदेव राठोड ( ९४.०५ टक्के ) कोमल मारुती कुडके ( ९३.०८ टक्के )सादिया हबीब शेख (८८.०६ टक्के ), जान्हवी अमोल हुंबरे (८८.०६ टक्के), मयान अनिल कांबळे ( ८६ टक्के)या विद्यार्थ्यांनी विशेष यश प्राप्त केले आहे.
याबाबत माजी उपमहापौर आबा बागुल म्हणाले कि, पुणे महानगरपालिकेच्या राजीव गांधी ई – लर्निंग स्कुलमध्ये आर्थिक दुर्बल घटकासह मध्यमवर्गीयांची मुले शिक्षण घेतात. गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी या शाळेने नावलौकिक प्राप्त केला आहे. शाळेची स्थापना माझ्या पुढाकारातून झाली. स्थापनेपासून सलग शंभर टक्के निकालाची परंपरा राखण्यात यश मिळाले आहे.केवळ दहावी -बारावीमध्येच नाही तर आयआयटीमध्येही या शाळेतील विद्यार्थी टॉपर ठरले आहेत. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण कसे मिळेल यासाठी शिक्षकवर्ग , सर्व लोकप्रतिनिधी आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांनी प्रयत्न केल्याने हे यश मिळाले आहे असेही आबा बागुल यांनी नमूद केले .


