युध्दविरामाचा निर्णय झाल्यानंतर अनेकांनी सोशल मीडियात याबाबत नाराजी व्यक्त केली. पाकिस्तानचे पुन्हा तुकडे करण्याची चांगली संधी भारताकडे होती, असे मत अनेकांनी व्यक्त केले. अमेरिकेपुढे भारत झुकल्याची पोस्टही अनेकांनी केली. तर काहींनी अमित शहांचा दोन वर्षांपूर्वीचा संसदेतील भाषणाचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने पाकमधील नऊ दहशतवादी तळ उध्वस्त केले. त्यानंतर पाकने पलटवार करताना भारतावर ड्रोन व क्षेपणास्त्र डाकली. पण भारतानेही चोख प्रत्युत्तर देत सर्व ड्रोन, क्षेपणास्त्र, लढाऊ विमाने हवेतच नेस्तनाबूत केली. दोन्ही देशांमधील संघर्ष टोकाला पोहचल्यानंतर शनिवारी अचानक युध्दविरामाची घोषणा झाली.
शहांचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ता. 6 डिसेंबर 2023 रोजीचा हा व्हिडीओ आहे. जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना (दुरुस्ती) विधेयक आणि जम्मू आणि काश्मीर आरक्षण (दुरुस्ती) विधेयकावरील चर्चेदरम्यानचे शहांचे भाषण पुन्हा चर्चेत आले आहे. यावेळी बोलताना शहा यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या दोन चुकांकडे लक्ष वेधले होते.
1948 मध्ये पाकिस्तानशी युध्दविरामासाठी सहमती दर्शविणे आणि काश्मीरचा मुद्दा संयुक्त राष्ट्रापर्यंत नेणे, या नेहरूंच्या ऐतिहासिक चुका होत्या, असे शाह म्हणाले होते. 1948 मध्ये सैन्य जिंकत होते. युध्दविराम तीन दिवसांनी पुढे ढकलला असता तर पीओके (पाकव्याप्त काश्मीर) भारतात असते, असेही शाह म्हणाले होते. शनिवारी झालेल्या युध्दविरामानंतर शहांचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

