स्टारविन्स फाउंडेशन च्या वतीने आयोजन : जगभरातून निवडक १५१ छायाचित्रांचा समावेश
पुणे : ऋतूंचे मनोहारी सौंदर्य, सण-उत्सवांचा रंगतदार ठसा, मानवी भावभावनांची गुंफण आणि ऐतिहासिक वास्तूंची शाही झलक हे सर्व एका ठिकाणी ‘क्षण’ या आंतरराष्ट्रीय छायाचित्र प्रदर्शनात अनुभवण्याची संधी पुणेकरांना मिळत आहे. प्रकाश आणि छायांच्या खेळातून साकारलेल्या भावस्पर्शी क्षणांचे दर्शन या प्रदर्शनात घडत असून यानिमित्ताने जगभ्रमंती उपस्थितांनी केली.
स्टारविन्स फाउंडेशनच्या वतीने विविध छायाचित्रांच्या माध्यमातून जगभरातील छायाचित्रकारांना व्यासपीठ मिळवून देणारे ‘क्षण’ हे आंतरराष्ट्रीय छायाचित्र प्रदर्शन पुण्यात बालगंधर्व कलादालन येथे भरविण्यात आले आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन आमदार हेमंत रासने यांच्या हस्ते झाले. यावेळी दिग्दर्शक सागर वंजारी, फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रणव तावरे, सहसंचालक राज लोखंडे, कौशिक कुलकर्णी, अक्षय जाधव, विवेक शिवेकर, सई कुलकर्णी, वृषाली वडनेरकर हे उपस्थित होते. हे प्रदर्शन दिनांक १७ मे पर्यंत सकाळी १० ते रात्री ९ दरम्यान बालगंधर्व कलादालन येथे विनामूल्य सुरू आहे.
प्रदर्शनात जर्मनी, यूएसए, कॅनडा, युनायटेड किंगडम, यांसह भारतातून कलकत्ता, आगरताळा, बंगळूरु, चेन्नई, मुजफ्फराबाद, राजस्थान, कोल्हापूर अशी देश-विदेशातून छायाचित्रे आलेली आहेत. तसेच विविध शहरातून देखील छायाचित्रे प्रदर्शनात पहायला मिळत आहेत.
प्रदर्शनाचे यंदाचे १० वे वर्ष आहे. प्रदर्शनात एकूण ५५० हून अधिक चित्रे प्रदर्शनाकरिता विविध ठिकाणांहून छायाचित्रकार यांमार्फत पाठवण्यात आली आहेत. त्यातील निवडक १५१ छायाचित्रे प्रदर्शनात मांडण्यात येणार आहेत. दरवर्षी या प्रदर्शनाला विविध ठिकाणांहून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

