पुणे, दि.१२ मे: ” जगाला युद्धात नाही तर बुद्धात उपाय सापडू शकतो. जगाने बुद्धांच्या शिकवणींपासून शिकून शांतीचा मार्ग अवलंबला पाहिजे. अस्थिरतेने ग्रासलेल्या या पृथ्वी वर भगवान गौतम बुद्धाच्या ज्ञानाच्या मार्गाचे अनुसरण करून जीवन समृद्ध होऊ शकते. ” असे विचार माईर्स एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी व्यक्त केले.
तथागत भगवान गौतम बुद्ध पौर्णिमा एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीमध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी कवी डॉ. संजय उपाध्ये, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस.एन.पठाण, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस, दुरदर्शनचे माजी संचालक डॉ. मुकेश शर्मा, माईर्स एमआयटीचे कुलसचिव प्रा.डॉ. रत्नदीप जोशी, डब्ल्यूपीयूचे कुलसचिव प्रा. गणेश पोकळे, प्रा.डॉ. दत्ता दंडगे, प्रा. विक्रांत गायकवाड व डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचे अध्ययन प्रमुख प्रा.डॉ. विनोद जाधव उपस्थित होते.
प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,” भगवान गौतम बुद्धांचे पंचशील तत्व आणि संत श्री ज्ञानेश्वर माऊलीचे पसायदान संपूर्ण जगाला शांतीचा मार्ग दाखवू शकतात. बुद्धांनी जागतिक धर्म, मानवता कल्याण आणि जातीभेदाच्या भिंती ओलांडून संपूर्ण मानवजातीला एकत्र आणण्याचे कार्य केले आहे. भारत हा जगभर भगवान बुद्ध आणि महात्मा गांधीसाठी ओळखला जातो.”
डॉ.आर.एम.चिटणीस म्हणाले,”भगवान बुद्धांनी जगाला शांती व अहिंसेचा संदेश दिला. जगाला सत्य, शांती आणि मानवतेचा संदेश देणारे बुद्धांचे पंचशील तत्व मानवी जीवनाला योग्य दिशा देईल.”
डॉ. एस.एन.पठाण म्हणाले,” वर्तमान काळात संपूर्ण देशाला बुद्धांच्या विचारांची गरज आहे. या धर्मामध्ये सर्व धर्मांचे तत्व व वैचारिकतेचा समावेश आहे. पाप पुण्याचा विचार सोडून सदाचाराने व्यवहार करावा.”
प्रा.दत्ता दंडगे म्हणाले,” २५०० वर्षापूर्वी स्थापन झालेला बौद्ध धर्म असून भगवान बुद्धांचे विचार आज ही आहे. हा धर्म पूर्ण तृप्तीतून उद्गम झालेला आहे. ज्ञानातून करूणा निर्माण होते आणि ती करूणा आचरणातून दिसायला हवी.”
या नंतर डॉ. संजय उपाध्ये, डॉ. मुकेश शर्मा, प्रा. गणेश पोकळे व प्रा. विक्रांत गायकवाड यांनी भगवान गौतम बुद्धांचे विचार सांगितले आणि त्यांच्याकडून शिकण्यास सांगितले.
प्रा.डॉ. विनोदकुमार जाधव यांनी सूत्रसंचालन केले. तसेच प्रा.डॉ. विक्रांत गायकवाड यांनी आभार मानले.
जग युद्धात नाही तर बुद्धात उपाय शोधू शकतो-डॉ. विश्वनाथ दा. कराड
Date:

