पुणे : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी फटाक्यांवर बंदी घातली आहे. फटाक्यांचा मोठा आवाज ऐकून कोणालाही गैरसमज होऊ नये म्हणून हे करण्यात आल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले आहे.तर पुण्यात भारत- पुढील साठ दिवसांसाठी बीम लाईट तसेच लेझर बीम लाईट सारखे प्रखर प्रकाश झोत सोडण्यास बंदी घालण्यात आली आहे. शुक्रवारी (९ मे) सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.मात्र मध्य रात्री नंतर म्हणजे AM १२ ते १ आणि चक्क AM २ ते ३ च्या दक्षिण पुण्यात कुठे तरी झालेल्या जोरदार फटाक्यांच्या आवाजाने अनेकांची झोप उडाली अशा बहाद्दरांना तातडीने शोधून त्यांच्यावर कारवाईची मागणी नागरीकातून होते आहे.
दरम्यान कालच लोहगाव येथे हवाई दलाचा तसेच नागरी विमानतळ आहे. वायुक्षेत्रात (एअर फिल्ड) प्रखर झोत सोडल्यास वैमानिकांचे डोळे दिपवून गंभीर अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विमानतळपासून १५ किलोमीटर अंतरापर्यंतच्या वायुक्षेत्रात पुढील ६० दिवसांसाठी प्रखर झोत सोडण्यास बंदी घालण्यात आल्याचे आदेश शर्मा यांनी दिले. या आदेशाचा भंग करणाऱ्यांविरुद्ध भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ अन्वये कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.युद्धजन्य परिस्थितीमुळे शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. गुरुवारी पाकिस्तानाने सीमावर्ती भागात क्षेपणास्त्रे डागल्यानंतर रात्रीपासून शहरातील बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर, विविध लष्करी संस्था, संशोधन संस्थांच्या परिसरात बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
युद्धजन्य परिस्थिती विचारात घेऊन अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केले आहे. समाज माध्यमातून प्रसारित होणाऱ्या संदेशांची खातरजमा करणे गरजेचे आहे. तसेच अनुचित प्रकार घडल्यास त्वरीत पोलिसांना माहिती द्यावी. समाज माध्यमातील संदेशांवर बारकाईने नजर ठेवण्यात आली आहे, असे पोलीस आयुक्तांनी सांगितले. सायबर सुरक्षा विचारात घेऊन समाज माध्यमातून प्रसारित करण्यात येणाऱ्या फाईलकडे दुर्लक्ष करावे. शक्यतो अशा फाइल उघडू नयेत, असेही आवाहन करण्यात आले आहे.

