
पुणे- संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५०व्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त आयोजित हरिनाम सप्ताहाच्या सातव्या दिवशी काल आळंदी देवस्थान आणि आळंदीकर ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने माऊलींचा रथोत्सव आयोजित करण्यात आला होता. यानिमित्त आळंदीची नगर प्रदक्षिणा करून इंद्रायणीकाठी तब्बल साडेसात हजार महिलांच्या उपस्थितीत दीपोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे, आमदार विजयबापू शिवतारे, आमदार उत्तमराव जानकर यांच्यासह आळंदी संस्थानचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ, विश्वस्त हभप चैतन्यमहाराज लोंढे, विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे, विश्वस्त ॲड. राजेंद्र उमाप, विश्वस्त ॲड. रोहिणताई पवार, विश्वस्त हभप पुरुषोत्तममहाराज पाटील यांच्यासह संस्थानचे पदाधिकारी, आळंदीचे ग्रामस्थ आणि वारकरी यांनी उपस्थित राहून माऊलींना वंदन केले. गेल्या आठवडाभर सुरू असलेल्या ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचा समारोपही यावेळी करण्यात आला.
यावेळी मंत्री महोदयांनी मोदी सरकार आणि महायुती सरकारच्या माध्यमातून इंद्रायणी नदी शुद्धीकरण प्रकल्प हाती घेण्यात आला असून लवकरच कामाचा प्रारंभ होणार आहे. इंद्रायणीचं ऐतिहासिक महत्त्व आणि वारकरी संप्रदायाची इंद्रायणीबद्दल असणारी आस्था शब्दात वर्णन करण्यापलिकडची आहे. म्हणूनच सदरील प्रकल्प प्राध्यानाने हाती घेण्यात आला आहे.असे जाहीर केले.

