मुंबई- भारत पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य परिस्थिती दरम्यान काँग्रेस पक्षाने केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर टीका केली आहे. आयएमएफच्या माध्यमातून पाकिस्तानला कर्ज मिळणार आहे. यावरून काँग्रेसने मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. त्याला आता भारतीय जनता पक्षाचे नेते केशव उपाध्ये यांनी प्रत्युत्तर दिले आहे. देशातील युद्धाच्या स्थिती असताना अशा काळात सरकारवर राजकीय वातावरण तयार करण्यासाठी आरोप करणे हे लज्जास्पद असल्याचे केशव उपाध्ये यांनी म्हटले आहे.टीका आत्ताच करायची होती? असा प्रश्न उपस्थित करत भाजप नेते केशव उपाध्ये यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. या संदर्भात काँग्रेसच्या या फालतू टीकेकडे बघण्याची वेळ नाही. देश एकीकडे युद्ध लढत असताना सरकारच्या पाठीमागे ठाम उभे राहण्याचे सोडून काँग्रेस राजकारण करत असल्याचा आरोप केशव उपाध्ये यांनी केला आहे. ही राजकीय टीकेची वेळ नाही, एवढे भान काँग्रेस पक्षाला कधी येणार? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे.
या संबंधीत एका पोस्टमध्ये केशव उपाध्ये म्हणाले की, आयएमएफ ने पाकिस्तानला बेल आउट पॅकेज जाहीर केलं असून या अंतर्गत त्यांना 1.3 अमेरिकन बिलियन डॉलर चे कर्ज मिळणार आहे. अर्थात हे कर्ज मिळू नये म्हणून भारताने IMF विषयी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. पण त्यासाठी झालेल्या मतदानाला अनुपस्थित राहिला, यावरून काँग्रेसने केंद्र सरकारवर काल टीका केली. वास्तविक पाहता साठ वर्षं या देशाची सत्ता भोगलेल्या काँग्रेसला IMF मधील नियम माहीत असायला हवेत; कारण IMF मध्ये कोणतेही नकारात्मक मतदान घेतले जात नाही. म्हणजे एकतर हो म्हणून मत देता येते किंवा मतदानावर बहिष्कार टाकता येतो. आणि आपण भारत देश म्हणून याबद्दल जाहीर नाराजी व्यक्त करीत बहिष्कार टाकला. जयराम रमेश यांच्यासारख्या जेष्ठ काँग्रेस नेत्याने काल मोदी सरकार घाबरून मागे सरकले, अशी टीका केली. देश युद्धाच्या स्थितीत असताना अशा काळात सरकार वर राजकीय वातावरण तयार करण्यासाठी आरोप करणे लज्जास्पद आहे. राजकारणाची ही वेळ नाही. काँग्रेसच्या या फालतू टीकेकडे बघण्याचीही ही वेळी नाही; परंतु देश एकीकडे युद्ध लढत असताना सरकारच्या पाठीमागे ठामपणे उभं रहायचं सोडून काँग्रेस राजकारण करत आहे. सरकार जर घाबरत असते, तर पाकिस्तानची जी भीक मागण्याची दयनीय अवस्था आज झाली आहे, ती झाली नसती. असो, राजकीय टीकेची ही वेळ नाही एवढ किमान भान काँग्रेस पक्षाला कधी येणार? असा प्रश्न केशव उपाध्ये यांनी उपस्थित केला आहे.

