लोणी काळभोरमध्ये एकाला अटक
पुणे-लोणी काळभोरमधील म्हातोबाची आळंदी येथे राहणाऱ्या एका तरुणाला पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयित आरोप करुन टोळक्याने बेदम मारहाण केल्याची घटना घडली. त्यानंतर संबंधित टोळक्याने परिसरातील वाहनांची तोडफोड करुन दहशत पसरवली. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून, त्याच्याबरोबर असलेल्या इतर साथीदारांचा शोध घेतला जात आहे.
याप्रकरणी आदित्य संतोष इंगोले (वय २४), करण शंकर गावडे (वय १९) यांच्यासह तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राेहित सुभाष जावळकर (वय ३२, रा. म्हातोबाची आळंदी, लोणी काळभोर) याने याबाबत लोणी काळभोर पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार रोहित जावळकर हा त्याच्या घराजवळ थांबला होता. त्यावेळी आरोपी गावडे, इंगोले आणि त्यांच्याबरोबर असलेले तीन साथीदार त्याठिकाणी आले. ‘तु पोलिसांचा खबरी आहे’, असा आरोप करुन आरोपी गावडे, इंगोले आणि साथीदारांनी त्याला थेट लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. जावळकर याच्या घराच्या परिसरातील रस्त्यावरील गाड्यांची तोडफोड करुन दहशत पसरवली गेली.या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला. पोलिसांनी आरोपी संतोष इंगोलेला अटक केली असून, त्याच्याबरोबर असलेल्या इतर साथीदारांचा शोध सुरू आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करण्यात येत आहे.

