शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून साहित्य संमेलनाची सुरुवात
कराड, ९ मे २०२५ : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आयोजित ३१ व्या अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनाचा शुभारंभ संत तुकाराम महाराजांचे वंशज रामदास महाराज मोरे यांच्या हस्ते सांस्कृतिक ज्ञान दिंडीने करण्यात आला. कऱ्हाड येथील दत्त चौकातील छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून या ज्ञान दिंडीने साहित्य संमेलनाची सुरुवात झाली. ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी, तुकोबांची गाथा आणि स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या कृष्णाकाठ या सांस्कृतिक ग्रंथाची ही ज्ञानदिंडी यावेळी काढण्यात आली. संपूर्ण महाराष्ट्रातून पाचशे पेक्षा जास्त साहित्यिक या ज्ञान दिंडीत सहभागी झाले होते. वारकऱ्यांच्या ज्ञानोबा तुकारामांच्या जयघोषात आणि महाराष्ट्रातील महामानवांच्या बहुसांस्कृतिक पेहरावात प्रचंड उत्साहात संमेलनाचे मुख्य निमंत्रक डॉ. शरद गोरे यांच्या नेतृत्वात ही दिंडी पार पडली. यावेळी कराड नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत व्हटकर, मुख्य महसूल अधिकारी अभिजीत पाटील, माजी आमदार आनंदराव पाटील, भाजप किसान मोर्चाचे रामकृष्ण वेताळ, भाजपचे भरत पाटील, शिवसेनेचे राजेंद्र माने, आयोजक विकास भोसले, डॉ. नितीन नाळे, डॉ. हनुमंत चिकने, संदीप पवार, विक्रम शिंदे, अमोल कुंभार, गणेश दिवेकर, रमेश रेडेकर, नम्रता पाटील, नंदा वर्पे, नंदा पवार, विद्या पवार, सरिता कलढोणे तसेच महाराष्ट्रातील अनेक ज्येष्ठ साहित्यिक यावेळी उपस्थित होते.

