पुणे : जी. ए. कुलकर्णी हे प्रतिभावान लेखक होते. त्यांच्या कथांचा भावार्थ समजणे अवघड असते. त्यांच्या ‘वंश’ या कथेवर साकारलेल्या लघुपटाद्वारे उत्तम वातावरण निर्मिती झाली असून पात्रांच्या भावना प्रेक्षकांपर्यंत सहजतेने पोहोचत आहेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांनी केले.
जी. ए. कुलकर्णी यांच्या जन्मशातब्दीनिमित्त सावी आर्टस् आणि वाईड विंग्ज मीडियातर्फे दोन वर्षांपूर्वी ‘वंश’ या लघुपटाची निर्मिती करण्यात आली. या लघुपटाला देश-विदेशात अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले असून कान्स चित्रपट महोत्सवातही हा लघुपट प्रदर्शित करण्यात आला होता. बीएमसीसीमध्ये आयोजित चित्रपटाच्या प्रदर्शन सोहळ्यात डॉ. आगाशे बोलत होते. जी. ए. कुलकर्णी यांच्या भगिनी नंदा पैठणकर, प्रसिद्ध अभिनेते गिरीश कुलकर्णी, प्रसिद्ध दिग्दर्शक सुनील सुखथनकर तसेच लघुपटातील कलावंत डॉ. वरदा जाधव, सूरज सातव, मैत्रेयी दाते उपस्थित होते. पुणेकरांनी या लघुपटावर पसंतीची मोहोर उमटविली. ‘वंश’ हा लघुपट यू-ट्यूबवरही प्रदर्शित करण्यात आला आहे.
लघुपटाविषयी बोलताना नंदा पैठणकर म्हणाल्या, ‘वंश’ ही कथा समजायला आणि माध्यमांतर करायला खूप अवघड आहे. पण सर्व कलाकारांनी मेहनतीने भूमिका साकारून प्रसंग उठावदार केले आहेत.
निर्मितीविषयी बोलताना गणेश जाधव म्हणाले, जीएंचा वेगळा चाहता वाचकवर्ग देश-परदेशात आहे. परदेशातील चाहत्यांपर्यंत लघुपटाच्या माध्यमातून कथा पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे.
गिरीश कुलकर्णी म्हणाले, जी. ए. कुलकर्णी यांचे लिखाण जागतिक पातळीवरील आहे. अशा थोर लेखकाच्या साहित्यकृतीचे माध्यमांतर करणे फार जबाबदारीचे असते. तरुण कलाकार-तंत्रज्ञांनी अवघड जबाबदाऱ्या पेलून पार पाडणे यासारखे सुख नाही. नवनव्या प्रयोगातून सुसंस्कृत समाज घडण्यास मदत होते.
सुनील सुखथनकर म्हणाले, जीएंच्या कथांचे माध्यमांतर व्हावे याविषयी अनेकवेळा नंदाताई यांच्याबरोबर चर्चा झाली. ही अवघड प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली त्याबद्दल कलाकार-तंत्रज्ञांचे अभिनंदन. जी. ए. कुलकर्णी यांच्या कथांमध्ये नियतीचा स्पर्श असतो. ‘वंश’ या कथेतून त्यांनी सामाजिक विषयासंदर्भात जाणीवही करून दिली आहे. लघुपटाच्या माध्यमातून केलेली मांडणी खूप समाधानकारक आहे.
डॉ. वरदा जाधव यांच्यासह प्रसिद्ध अभिनेते किशोर कदम, सूरज सातव, मैत्रेयी दाते यांच्या या लघुपटात भूमिका असून दिग्दर्शन ऋषी मनोहर यांनी केले आहे. निर्मिती गणेश जाधव यांची आहे तर पटकथा व संवाद गौरव बर्वे यांचे आहेत.
अनेक पुरस्कारप्राप्त ‘वंश’ लघुपटाला पुणेकरांची पसंती
Date:

