पुणे-राज्यात गेल्या कित्येक महिन्यांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सुकर झाला आहे. उशीरा का होईना, न्यायालयाने लांबलेल्या निवडणुकांसंदर्भात संविधान अनुरूप निकाल दिला आहे, असे मत व्यक्त करीत बहुजन समाज पक्षाचे प्रदेश महासचिव आणि पश्चिम महाराष्ट्र झोन मुख्य प्रभारी डॉ.हुलगेश चलवादी यांनी न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले. येत्या चार महिन्यांमध्ये होऊ घातलेल्या महानगर पालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीसाठी सज्जा व्हा,असे आवाहन त्यांनी पक्षाच्या कॅडरला केले. यासोबतच निवडणुका ‘बॅलेट पेपर’ वर घेण्याची मागणी त्यांनी केली आहे.
चलवादी म्हणाले, सर्वसामान्यांना मतदान आणि नेतृत्व निवडीचे अधिकार बहाल करणारे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या लोकशाहीच्या संकल्पनेनुसार निवडणुका ‘बॅलेट पेपर’वर होणे आवश्यक आहे. बूथ बळकावणे, मतपत्रिकांचा गैरवापर करणे असे प्रकार आता तंत्रज्ञानाने सुसज्जीत महाराष्ट्रात होणे शक्य नाही, त्यामुळे मत पत्रिकांवर निवडणूक घ्यावी. शोषित, पीडित, वंचित आणि उपेक्षितांचा विकासासाठी आणि ‘सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय’ या नितीनुसार समाज परिवर्तनासाठी सत्तेच्या चाव्या बसपाकडे असणे आवश्यक आहे. राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनावर हत्ती निवडणूक चिन्ह असलेला बसपाचा ‘निळा झेंडा’ फडकणे आवश्यक आहे. ‘जिसकी जितनी संख्या भारी, उसकी उतनी हिस्सेदारी’ ही संकल्पना समोर आणत बहुजनांचे नेतृत्व करणारी बसपा पूर्ण ताकदीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उतरणार आहे. शहर, जिल्हा तसेच ग्रामीण पातळीवर बसप कॅडर निवडणुकीसाठी सज्ज झाला आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर येत्या चार आठवड्यांमध्ये अधिसूचना काढणे राज्य सरकारला बंधनकारक राहणार आहे. विशेष म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत २०२२ पूर्वीची ओबीसी आरक्षणाची स्थिती कायम ठेवण्याचे आदेश दिले आहे. आरक्षणासंदर्भात तिढा त्यामुळे तूर्त सुटला आहे, असे डॉ.चलवादी म्हणाले. या निवडणुकीत मतदार त्यांची फसवणूक करणाऱ्या प्रस्थापित राजकीय पक्षांना धडा शिकवेल आणि बहुजनांच्या हक्काचे विचारपीठ असलेल्या बसपाला पाठबळ देईल, असा विश्वास डॉ.चलवादी यांनी व्यक्त केला.

