पुणे : भारतीय सैन्य दलानं पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हल्ला करुन पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला. भारतीय सैन्य दलाच्या जवानांनी पाकिस्तानमधील 9 दहशतवादी तळांवर केलेल्या या हल्ल्यात अनेक दहशतवादी मारण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. भारतीय सैन्याने केलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर देशभरात आनंदोत्सव साजरा केला जात आहे.महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या उपस्थितीत ‘व्यंगचित्र प्रदर्शन आणि कार्यशाळा’ या कार्यक्रमाचा समारोप आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्यांना याबाबत विचारलं असता त्यांनी आपलं मत व्यक्त केलं. ‘ऑपरेशन सिंदूर’बाबत मनसेचे नेते अमित ठाकरे यांना विचारलं असता ते म्हणाले की, “भारतीय सैन्याचा आम्हाला अभिमान आहे. पहलगाम हल्ल्यानंतर जेवढं दुःख मला झालं होतं, तेवढं समाधान आज मला मिळत नाहीये, कारण ते दहशतवादी अजूनही फिरत आहेत. पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी अजूनही मोकाट फिरत आहेत, म्हणून मला तो आनंद मिळालेला नाही. न्याय तेव्हा मिळेल जेव्हा ते दहशतवादी मारले जातील.”
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पाकिस्तानने देखील भारताला इशारा दिला. याबाबत अमित ठाकरे यांना विचारलं असता ते म्हणाले की “त्यांच्या नऊ ठिकाणी जाऊन आपण हल्ले केले आहेत. आता ते काय आपल्याला इशारा देतील. युद्ध हे उत्तर नाही. ज्या दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे, त्यांना ठेचून मारलं पाहिजे. सामान्य लोकांचा का बळी घेत आहेत. आपल्या सैन्याला सलाम असून, त्यांना जे सांगितलं जात आहे ते करत आहेत. पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी अजूनही मोकाट फिरत आहेत, म्हणून मला तो आनंद अजून मिळालेला नाही.”
सैन्याला सलाम… पण.. पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी अजूनही मोकाट..
Date:

