पुणे :जम्मू-कश्मीरमधील पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज भारताने चोख प्रत्युत्तर दिले आहे. भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’ द्वारे पाकिस्तानातील ४ आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ५ असे एकूण ९ दहशतवादी तळ उद्धवस्त केले आहेत. भारताच्या या कारवाईनंतर देशभरातून प्रतिक्रिया समोर येत आहेत. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील प्रतिक्रिया देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले आहे. भारताचे सामर्थ्य आणि निर्धार जगाला दाखवून देणारा निर्णय घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे अभिनंदन!, असे पाटील यांनी म्हटले.
चंद्रकांत पाटील यांनी आपल्या सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले कि ,पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा भारतीय सुरक्षा दलानी पुरेपूर बदला घेतला. पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे तब्बल ९ तळ क्षेपणास्त्र हल्ल्यात उद्धवस्त करण्यात आले. यात जैश ए मोहम्मद आणि लष्कर ए तोयबा या संघटनाच्या तळांचा समावेश आहे. जिवाची बाजी लावून भारतीय सुरक्षा दलानी ऑपरेशन सिंदूर यशस्वी केले. भारतीय सुरक्षा दलांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. एक सामान्य भारतीय नागरिक म्हणून दहशतवादाला चोख प्रत्युत्तर देण्याच्या संदर्भात मोदी सरकारच्या प्रत्येक कृतीच्या पाठीशी आम्ही ठाम उभे आहोत, असे पाटील यांनी म्हटले. जगातील महत्वाच्या देशांशी संवाद साधून आणि भारताची न्याय्य बाजू पटवून देत, अत्यंत विचारपूर्वक हा निर्णय घेण्यात आला. भारताचे सामर्थ्य आणि निर्धार जगाला दाखवून देणारा निर्णय घेतल्याबद्दल पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांचे अभिनंदन!, असे मत पाटील यांनी व्यक्त केले.

