मुंबई- आपल्या भारतात पहलगाम इथे जेव्हा हल्ला झाला होता तेव्हा मी पहिले ट्विट केले होते की ज्यांनी हल्ला केला आहे अतिरेकी, दहशतवादी जे कोणी असतील त्यांना आपण धडा शिकवला पाहिजे, अत्यंत कठोर असा की त्यांच्या पुढच्या पिढ्यांनी लक्षात ठेवले पाहिजे. पण दहशतवादी हल्ल्याचे उत्तर हे युद्ध नसते, असे विधान मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केले आहे. भारताने केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ वर प्रतिक्रिया देताना ते बोलत होते.
राज ठाकरे म्हणाले, युद्ध हे काही उत्तर नाही. आता अमेरिकेत ट्विन टॉवर पाडले, पेंटागॉनवर हल्ला झाला म्हणून त्यांनी जाऊन युद्ध नाही केले. त्यांनी ते अतिरेकी ठार मारले. हे युद्ध परिस्थिती आणायची आणि आता मॉक ड्रिल करायचे आणि ते सायरन वाजवणार वगैरे वगैरे. मुळात ही गोष्ट का घडली हे पण आपण लक्षात घेण्यासारखे आहे. मला असे वाटते की थोडे अंतर्मुख होऊन होणे गरजेचे आहे.
अतिरेकी अजून तुम्हाला सापडले नाहीत-पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले, पाकिस्तानला काय बरबाद करणार, तो आधीच बरबाद देश आहे. त्याला काय बरबाद करणार तुम्ही? आणि प्रश्न असा आहे की ज्यावेळी अतिरेक्यांनी हल्ला केला ते अतिरेकी अजून तुम्हाला सापडले नाहीत. ज्या ठिकाणी हजारो पर्यटक जिथे जात आहेत, इतकी वर्ष जात आहेत, तिथे सेक्युरिटी का नव्हती? हे प्रश्न जास्त महत्त्वाचे आहेत. आपल्या देशात कोम्बिंग ऑपरेशन करून त्यांना हुडकून काढणे हे जास्त गरजेचे आहे. हे एयर स्ट्राइक करून लोकांना भरकटवून आणि युद्ध हे काही उत्तर नाही होऊ शकत.
देशभर कोम्बिंग ऑपरेशन करा-दुसरी गोष्ट म्हणजे आता कसे झाले आहे याच्यात सरकारच्या चुका या तुम्हाला दाखवल्याच पाहिजेत. ज्यावेळेला हा प्रकार झाला त्यावेळी पंतप्रधान सौदी अरेबियामध्ये होते, तिथला दौरा अर्धवट सोडला त्यांनी आणि नंतर बिहारला कॅम्पेनला गेले. मला वाटते हे करायची गरज नव्हती. परत केरळमध्ये जाऊन तिथे अदानीच्या पोर्टचे उद्घाटन केले. परत वेव्हचा कार्यक्रम केला. इतकी जर गंभीर परिस्थिती आहे तर या गोष्टी टाळता आल्या असत्या. नंतर येऊन मॉक ड्रिल करायचे वगैरे हे काही उत्तर नाही यावरचे. जे अतिरेकी आहेत त्यांना हुडकून काढणे हे करणे महत्त्वाचे आहे.
आज आपल्या देशातला पोलिस दल विशेषतः मुंबई आणि महाराष्ट्रामधल्या पोलिसांची तर प्रशंसाच करेल की त्यांना सगळ्याच गोष्टी माहीत आहेत. कुठे कोणत्या गोष्टी चालू आहेत आणि कुठे काय चालू आहे. आज आपल्या देशातले प्रश्न संपत नाहीयेत आणि आपण युद्धाला सामोरे जातो आहोत, मला असे वाटते ही काही योग्य गोष्ट नाही. आज नाक्या नाक्यावर ड्रग्स मिळत आहेत, हे ड्रग्स कुठून येत आहेत, या गोष्टीच्या खोलात जाणे गरजेचे आहे, असे राज ठाकरे म्हणाले.
ऑपरेशन सिंदूर या नावावर बोलताना राज ठाकरे म्हणाले, हे नाव वगैरे देऊन याने काही भावनांचा विषय येत नाही. प्रश्न असा आहे की तुम्ही काय पाऊल उचलत आहात आणि इतके दिवस हे जे काही कार्यक्रम झाले, या कार्यक्रमांची काही आवश्यकता नव्हती, असे स्पष्ट मत राज ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.

