भाजपचा भ्रष्टाचार आणि पुण्याची दैना
याविरोधात मते मागणार
पुणे : महापालिका निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी काँग्रेस पक्ष तयार असून गेल्या १० वर्षात विकासकामांमध्ये भाजपने केलेला भ्रष्टाचार आणि पुणे शहराची केलेली दैना या विरोधात जनतेकडे मतं मागणार आहोत, अशी प्रतिक्रिया प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि माजी आमदार मोहन जोशी यांनी आज प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तात्काळ घेण्यासंदर्भात दिलेला निर्णय अत्यंत स्वागतार्ह असून, लोकशाहीच्या दृष्टीने तो एक ऐतिहासिक आहे असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे. ओबीसी आरक्षण कायम राखल्याबद्दल सुप्रिम कोर्टाचे आम्ही अभिनंदन करीत आहोत,
निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी काँग्रेस पक्ष तयारीनिशी उतरत आहे. भाजपच्या भ्रष्टाचारी आणि मनमानी कारभारामुळे पुणेकर वैतागलेले आहेत. आगामी महापालिका निवडणुकीत भाजपला धडा शिकवल्या शिवाय पुणेकर रहाणार नाहीत, असा विश्वास मोहन जोशी यांनी व्यक्त केला.
पुणेकरांना चांगली पीएमपी बस सेवा भाजप देऊ शकला नाही. मुळा मुठा नद्या सुशोभीकरण, शुद्धीकरण यातही भाजपला अपयश आलेले आहे. वाहतुकीची कोंडी सोडविण्याची फक्त आश्वासने पुणेकरांना देण्यात आली. प्रत्यक्षात ती कोंडी अजूनही सुटलेली नाही. भाजपच्या अशा अनेक फसव्या घोषणा आणि भ्रष्टाचार आम्ही पुणेकरांपुढे मांडणार आहोत, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.

