सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे स्वागत
पुणे-पुढील चार महिन्यात राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यात याव्यात, या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी स्वागत केले असून, आम्ही पक्ष म्हणून निवडणुकीसाठी सज्ज असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
घाटे म्हणाले, “पुणे शहरात भाजपचे संघटन अतिशय मजबूत आहे. आम्ही नुकतीच शहरात साडेपाच लाख प्राथमिक पक्ष सदस्यांची नोंदणी पूर्ण केली आहे. त्याबरोबर नऊ हजार सक्रिय सदस्य नोंदणीचे लक्ष्य अंतिम टप्प्यात आहे. गेल्या निवडणुकीत भाजपचे 100 नगरसेवक निवडून आले होते. विविध पक्षातून पाच नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी 105 हून अधिक नगरसेवक निवडून आणण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.”
घाटे पुढे म्हणाले, ” लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पुणेकरांनी भाजपला निर्विवाद यश मिळवून दिले. पुणे लोकसभेसह आम्ही लढवलेल्या विधानसभेच्या सहाही जागा आम्ही जिंकल्या. एका ठिकाणी मित्र पक्षाला विजय मिळाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील राज्य सरकार यांच्या माध्यमातून पुणे आणि परिसरात खूप मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू आहेत. विविध लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचत आहेत. महापालिकेतील पाच वर्षांच्या सत्ता काळात भाजपने मोठ्या प्रमाणात पायाभूत विकासकामे केली आहेत. त्यामुळेच लोकसभा, विधानसभा निवडणुकीप्रमाणे महापालिकेतही पुणेकर भाजपला विजयी करतील असा विश्वास वाटतो.”

