एसटीच्या महिला कर्मचाऱ्यांना रात्रीची ड्यूटी नसणार
रायगड–राज्य परिवहन महामंडळाच्या कामगार संघटनेचे 57 वे राज्यव्यापी अधिवेशन सोमवारी रायगड येथे पार पडले. या अधिवेशनात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासह मंत्री भरत गोगावले देखील उपस्थित होते. यावेळी भाषण करताना भरत गोगावले यांनी कर्मचाऱ्यांना दिलेल्या सल्ल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. एक ऐवजी दोन चपटी प्या पण ड्यूटी संपल्यावर, असा सल्ला गोगावले यांनी दिला आहे.
भरत गोगावले उपस्थित एसटी कर्मचाऱ्यांना संबोधित करताना एसटी चालकांकडून मद्यपान केल्याने अपघात होत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. तेव्हा गोगावले म्हणाले, एक ऐवजी दोन चपटी प्या पण ड्यूटी संपल्यावर, असा सल्ला त्यांनी दिला. त्यांनी दिलेल्या या सल्ल्याची सध्या चर्चा सुरू आहे. ते म्हणाले, तुमच्याकडून अपघात होतात. कुणी जाणून बुजून करत नाही. मोबाईल आणि नशापन करून अपघात होतात. ड्युटी संपल्यावर एक चपटीऐवजी दोन प्या.
यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. एसटीच्या महिला कर्मचाऱ्यांना रात्रीची ड्यूटी नसणार आहे. महिला कर्मचाऱ्यांना रात्रीची ड्यूटी नसणार, रात्री 8 वाजेपर्यंत त्यांची ड्यूटी कशी संपेल हे पहावे, अशा सूचना सरनाईक यांनी दिल्या आहेत. अधिवेशनाच्या सुरुवातीलाच महिला कर्मचाऱ्यांनी या बाबत परिवहन मंत्री सरनाईक यांना निवेदन दिलं होतं. त्याचा उल्लेख करत सरनाईक यांनी एसटीचे उपाध्यक्ष माधव कुसेकर यांना या बाबत जाहिररित्या सूचना केल्या.
दरम्यान, यावेळी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी आपल्या भाषणात म्हटले, परिवहन मंत्र्यांनी स्वतःच्या लालपरी घेण्याचा निर्णय घेतला. एसटी नफ्यात नाही. जर आम्हाला राज्य सरकारी कर्मचाऱ्यांइतके वेतन दिले तर आमचा कर्मचारी सांगेल हे सरकार चांगले आहे, त्यालाच निवडून द्या. काही दिवसापूर्वी 2 दिवसांचा संप झाला. आम्हाला राजकारण करायचे नाही. उदय सामंत हे आपले वकील आहेत. ते आपले उज्वल निकम आहेत. या मंडपातून परत जाताना आमच्या चेहऱ्यावर हसू येईल अशी घोषणा करा. तसेच आरटीओ दंड करतात, ते थांबवा. काही अधिकारी कर्मचाऱ्यांशी नीट बोलत नाहीत. कर्मचाऱ्यांवर किरकोळ कारणावरून निलंबनाची कारवाई होते, अशी तक्रारही शिंदे यांनी यावेळी केली आहे.

