चेन्नई, – स्टार हेल्थ अँड अलाइड इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (स्टार हेल्थ इन्शुरन्स) या भारतातील सर्वांत मोठ्या व्यक्तिग्राही आरोग्यविमा कंपनीच्या संचालक मंडळाच्या अध्यक्षपदी राजीव खेर यांची नियुक्ती झाली आहे. खेर हे या कंपनीत सध्या स्वतंत्र संचालक म्हणून काम करीत आहेत. त्यांची नियुक्ती २९ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत निश्चित करण्यात आली. भारतीय विमा नियामक व विकास प्राधिकरण (ईर्डा) या संस्थेची मंजुरी मिळाल्यानंतर खेर यांच्या नियुक्तीला अधिकृतता प्राप्त होईल.राजीव खेर यांना आंतरराष्ट्रीय व्यापार, औद्योगिक विकास, शाश्वत धोरणे आणि नियामक प्रशासन या क्षेत्रांत चार दशकांहून अधिक काळाचा अनुभव आहे. भारतीय प्रशासकीय सेवेतील वरिष्ठ अधिकारी असलेले खेर हे केंद्रात वाणिज्य सचिव होते. त्यांनी पर्यावरण आणि वाणिज्य मंत्रालयांमध्ये अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या हेत. तसेच स्पर्धा अपीलीय न्यायाधिकरणाचे सदस्य म्हणूनही त्यांनी कार्य केले आहे. २०१५ ते २०२० या काळात भारताचे विदेश व्यापार धोरण घडवण्यात, आंतरराष्ट्रीय व्यापार वाटाघाटींचे नेतृत्व करण्यात आणि जागतिक स्तराशी सुसंगत नियामक चौकट निर्माण करण्यात त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. धोरणात्मक सल्लागार म्हणून त्यांची ख्याती सरकार, आंतरराष्ट्रीय कंपन्या आणि धोरण अभ्यास संस्थांमध्येही आहे.
या नियुक्तीबाबत प्रतिक्रिया देताना राजीव खेर म्हणाले, “भारताच्या सामाजिक व आर्थिक स्थैर्यासाठी आरोग्यविमा अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे. या टप्प्यावर ही जबाबदारी स्वीकारणे ही माझ्यासाठी गौरवाची बाब आहे. ‘स्टार हेल्थ’ने ग्राहक-केंद्रिततेसह नवकल्पनांचा अवलंब करत एक विश्वासार्ह ब्रँड म्हणून स्थान निर्माण केले आहे. संचालक मंडळ आणि व्यवस्थापनासोबत जवळून काम करताना मी चांगल्या प्रशासकीय पद्धती बळकट करण्यावर, दीर्घकालीन मूल्यनिर्मितीवर आणि आरोग्य तसेच विमा क्षेत्रातील बदलत्या परिस्थितीत कंपनीला योग्य दिशेने नेण्यावर भर देईन. समावेशक विकास, नैतिक नेतृत्व आणि संस्थात्मक उत्कृष्टता यावर आमचा ठाम विश्वास राहील.”
या संदर्भात ‘स्टार हेल्थ’चे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रॉय म्हणाले, “या महत्त्वपूर्ण टप्प्यावर राजीव खेर यांचे नेतृत्व लाभणे हे आमच्यासाठी मोठे भाग्य आहे. त्यांचे दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व, धोरण क्षेत्रातील सखोल जाण आणि सार्वजनिक हिताविषयीची समज स्टार हेल्थच्या पुढील विकासप्रवासात मोलाची ठरेल. विविध क्षेत्रांतील त्यांच्या अनुभवामुळे स्टार हेल्थ अधिक सक्षम, ध्येयधोरणांनी प्रेरित आणि भविष्यातील आव्हानांना तोंड देणारी संस्था बनण्याच्या दिशेने पुढे जाईल. सर्वांसाठी सहज उपलब्ध आणि विश्वासार्ह आरोग्यविमा सेवा देण्याच्या आमच्या संकल्पात त्यांच्या मार्गदर्शनामुळे नक्कीच अधिक बळ येईल.”

