पुणे-केंद्र सरकारने खबरदारी म्हणून देशभरातील महत्त्वाच्या शहरांत युद्धाचे मॉक ड्रील करण्याचा निर्णय घेतला आहे. या शहरांत महाराष्ट्रातील 16 ठिकाणांचा समावेश असून, तिथे बुधवारी एकाचवेळी ही मॉकड्रील होणार आहे.यासंबंधीच्या माहितीनुसार, पाकिस्तानसोबतच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालयाने देशातील 244 शहरांत युद्धाची मॉकड्रील घेण्याचे आदेश दिलेत. त्यानुसार दोन्ही देशांमधील तणाव वाढला किंवा युद्धाची स्थिती उद्धवली तर आपत्कालीन स्थितीत काय करावे? यासंबंधीचे दिशानिर्देश जारी केलेत. त्यानुसार, देशभरात 7 मे रोजी नागरी संरक्षण जिल्हे, ठिकाणे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ही मॉक ड्रील घेतली जाणार आहे.
देशपातळीवर घेण्यात येणाऱ्या मॉकड्रीलमध्ये महाराष्ट्रातील 16 ठिकाणांचा समावेश आहे. या ठिकाणांची 3 गटांत विभागणी करण्यात आली आहे. सर्वात पहिला गट हा अतिसंवेदनशील ठिकाणांचा आहे. यात देशाची आर्थिक राजधानी मुंबईसह लगतच्या उरण व तारापूर या 2 ठिकाणांचा समावेश आहे. दुसऱ्या गटात ठाणे, पुणे, नाशिक, रोहा -धाटाव – नागोठणे, मनमाड, सिन्नर, थळ वैशेत, पिंपरी चिंचवड या ठिकाणांचा समावेश आहे.
तर तिसऱ्या गटात छत्रपती संभाजीनगर, भुसावळ, रायगड, रत्नागिरी, व सिंधुदुर्ग या ठिकाणांचा समावेश आहे. या तिन्ही गटांतील 16 ठिकाणांवर बुधवारी युद्धाची मॉकड्रील केली जाईल. त्यामुळे तेथील प्रशासनाने त्याची जय्यत तयारी सुरू केली आहे.
वीज पुरवठा खंडित करून ब्लॅकआऊट केले जाणार
या मॉकड्रील अंतर्गत हवाई हल्ल्यावेळी वाजवले जातात तसे सायरन वाजवले जातील. तसेच अनेक शहरांत वीज पुरवठा खंडीत करून ब्लॅकआऊट केले जाईल. सायरन वाजताच नागरिकांना सुरक्षित आश्रयस्थळी धाव घ्यावी लागले. स्थानिक प्रशासन, पोलिस, होमगार्ड्स, एनसीसी, एनएसएस, नेहरू युवा केंद्र संघटना व शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थी या मॉकड्रीलमध्ये सहभागी होणार आहेत. यासंबंधी उपरोक्त सर्वच ठिकाणच्या प्रशासनाने योग्य ती पूर्वतयारी केली आहे.
मॉकड्रीलमध्ये नेमके काय होणार?
हवाई हल्ल्याची पूर्वसूचना दिली जाणार.
हल्ल्यावेळी सुरक्षित ठिकाणी लपून बसण्याचे प्रशिक्षण जिले जाणार.
रात्रीच्या वेळी शत्रूला महत्त्वाची ठिकाणे समजू नये यासाठी ब्लॅकआऊट केले जाणार.
महत्त्वाचे कारखाने शत्रूला दिसू नयेत म्हणून योग्य ती उपाययोजना केली जाणार.
सामान्य नागरिकांना बचावकार्याचे प्रशिक्षण दिले जाणार.
घरात पाणी, अन्न, इंधनाचा साठा कसा करावा याचे महत्त्वे सांगितले जाणार.
मॉकड्रीलवेळी कुठे वाजणार सायरन?
प्रशासकीय भवन
सरकारी भवन
पोलीस मुख्यालय
अग्निशमन दल केंद्र/ मुख्यालय
लष्करी तळ
शहरातील मोठे बाजार
गर्दीची ठिकाणे
सायरन वाजताच काय करावे अन् काय करु नये?
सायरन वाजताच घाबरून जाऊ नका.
कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका.
तातडीने सुरक्षित ठिकाणी आसरा घ्या. किमान 5 ते 10 मिनिटांच्या आत सुरक्षित स्थळ गाठा.
मोकळ्या जागेपासून दूर राहा.
रेडिओ, टीव्ही आणि शासकीय सतर्कतेच्या इशाऱ्यांवर लक्ष द्या.
घरात किंवा एखाद्या सुरक्षित इमारतीत प्रवेश करा.

