पुणे-भाजपमध्ये सध्या केंद्र आणि राज्य पातळीवर संघटनात्मक बदलांची तयारी सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर पुणे शहराध्यक्ष पदावर बदल होण्याची शक्यता अधिक स्पष्ट होत चालली आहे. काही दिवसांपूर्वी मंडल अध्यक्षांची नियुक्ती झाल्यानंतर आता शहर आणि जिल्हाध्यक्ष निवडीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली असून, नुकतेच यासाठी मतदान प्रक्रिया देखील पार पडली आहे.सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुणे शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षपदासाठीच्या नावांची निवड पूर्ण झाली असून, त्याची अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येणार आहे. भाजपकडून राज्यातील तब्बल ७८ शहर आणि जिल्हाध्यक्षांची नावे एकाच वेळी जाहीर होणार असून, त्यासाठी मुहूर्तही निश्चित करण्यात आला आहे.
पुणे शहराध्यक्ष पदासाठी सध्या भाजपचे विद्यमान अध्यक्ष धीरज घाटे, माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, गणेश बिडकर, गणेश घोष आणि राजेश पांडे ही नावे चर्चेत आहेत. महिला नेत्यांमध्ये माजी नगरसेविका वर्षा तापकीर, आरती कोंढरे आणि वर्षा डहाळे यांची नावे पुढे येत आहेत. मात्र सर्वाधिक चर्चा ही गणेश बिडकर आणि श्रीनाथ भिमाले यांच्या नावाभोवती केंद्रित आहे.

