पुणे- रात्री ज्या राकेश निसार ला पोलिसांनी बाईक वरून पत्नीचा मृतदेह विल्हेवाटीसाठी नेताना पकडला .त्याच्या ८ वर्षाच्या मुलाने आपल्या समोरच पित्याने आईची हत्या केल्याची आखो देखी पोलिसांना कथन केली आहे. या आठ वर्षांच्या मुलासमोरच आपल्या पत्नीचा अत्यंत निर्घृणपणे खून केल्याची घटना घडली आहे. पत्नीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी जाताना पोलिसांनी आरोपीला पकडले. ही हत्या घरगुती वादातून झाल्याचे समोर आले आहे. ही घटना नांदेड सीटीजवळ घडली आहे.
घटनेची अधिक माहिती अशी की, स्वयंपाक करण्यावरून व घरात पैसे न दिल्याच्या कारणावरून पती व पत्नीमध्ये वाद झाले. हा वाद इतका विकोपाला गेला की आरोपी पतीने आपल्या 8 वर्षांच्या मुलासमोरच पत्नीचा गळा दाबून खून केला. त्यानंतर पत्नीचा मृतदेह कपड्यात गुंडाळून विल्हेवाट लावण्यासाठी दुचाकीवरून घेऊन निघाला. यावेळी रस्त्यातच पोलिसांनी त्याला पकडले. यावेळी चौकशीत आरोपीने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांना त्याच्या बोलण्यावर संशय आला व कसून चौकशी सुरू केली. यावेळी पोलिसांनी 8 वर्षांच्या मुलाला विचारले असता, मुलाने घडलेला संपूर्ण प्रकार डोळ्यात पाणी आणत सांगितला आणि आरोपी पतीचे पितळ उघडे पडले.
राकेश निसार असे आरोपीचे नाव आहे तर बाबीता निसार असे मृत महिलेचे नाव आहे. आंबेगाव आणि भारती विद्यापीठ पोलिसांनी राकेश निसारला रंगेहाथ पकडले आणि सिंहगड पोलिसांनी अटक केली. राकेश हा धायरी परिसरात आपल्या कुटुंबासोबत राहत होता व मजूरी काम करायचा. रात्री एकच्या सुमारास स्वामीनारायण मंदिरासमोरून भुमकर पुलाजवळ राकेश आपल्या पत्नीचा मृतदेह घेऊन जात असताना काही लोकांनी पाहिले. येथील नागरिकांना संशय आला व त्यांनी तातडीने पोलिसांना याची कल्पना दिली. यावेळी भुमकर पुलाजवळ बिट मार्शल पोहोचले आणि राकेशला पकडले. यावेळी राकेशने दुचाकी सोडून पळून जाण्याचा प्रयत्न केला.
मृतदेह कोणाचा आहे आणि कुठे घेऊन चालला असा प्रश्न विचारल्यावर राकेशने उडवाउडवीचे उत्तर देण्यास सुरू केले. मित्राने मृतदेह मागवला होता. त्याला खेडशिवपूरजवळ नेऊन देतो असे त्याने सांगितले. तसेच मृत पत्नीने फाशी घेत आत्महत्या केल्याचेही त्याने सांगितले. पोलिसांना संशय आला व त्यांनी थेट राकेशचे घर गाठले. यावेळी घरात राकेश आणि बाबीताचा आठ वर्षांचा मुलगा होता. मुलाकडे चौकशी केली असता मुलाने पोलिसांना सांगून टाकले की वडिलांनीच आईला मारून टाकले. आई आणि वडिलांमध्ये जेवणावरून आणि पैसे देण्याच्या कारणावरून रोज वाद व्हायचे. आज भांडण झाल्यावर बाबांनीच आईला गळा दाबून मारून टाकले, असे उत्तर मुलाने पोलिसांना दिले. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.

