मॉक ड्रिलमध्ये काय?
- हवाई हल्ल्याचा इशारा देणारे भोंगे वाजणार
- नागरिक, विद्यार्थ्यांना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण
- वीज बंद करून ब्लॅक आउटसाठीची तयारी
- महत्त्वाच्या सुविधा अन् कृती लपवून ठेवणे
- आपत्कालीन परिस्थितीत समन्वयाने कृती
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर गृह मंत्रालयानेही संभाव्य सुरक्षेसाठी सर्व राज्यांना ७ मे रोजी रंगीत तालीम घेण्याचे आदेश दिले आहेत.एकीकडे दिल्लीमध्ये उच्चस्तरीय बैठकांचे सत्र सुरू असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांची या अनुषंगाने दूरध्वनीवरून चर्चा झाली.
दहशतवादाविरोधातील लढाईत आम्ही भारताच्या पाठीशी आहोत असे सांगत असे पुतीन यांनी पहलगाम हल्ल्याचा निषेध केला. जपाननेही भारताला पाठिंबा दिला आहे.
पाकिस्तानविरुद्धच्या संभाव्य लष्करी कारवाईच्या पार्श्वभूमीवर देशातील नागरी संरक्षण यंत्रणा अधिक सक्षम करण्याच्यादृष्टीने गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना बुधवारी ( ता. ७ ) सर्वसमावेशक सज्जतेची रंगीत तालीम (मॉक ड्रिल) घेण्याचे आदेश दिले आहेत. याअंतर्गत अनेक महत्त्वाच्या उपाययोजना आखण्यात येतील.
तत्पूर्वी, पंतप्रधान मोदींनी सोमवारी संरक्षण सचिव राजेशकुमारसिंह यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत त्याबाबतची माहिती जाणून घेतली. पंतप्रधान मोदींनी कालच (ता. ४) हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल ए. पी. सिंह यांच्याकडून हवाई दलाच्या सज्जतेची माहिती घेतली होती. त्यानंतर नौदलप्रमुख अॅडमिरल दिनेश के. त्रिपाठी यांनीही शनिवारी (ता. ३) पंतप्रधानांची भेट घेतली होती. त्यानंतर आज संरक्षण सचिव राजेशकुमार सिंह पंतप्रधानांना भेटले. लोककल्याण मार्गावरील पंतप्रधानांच्या निवासस्थानी ही बैठक झाली.
या बैठकीचा तपशील जाहीर करण्यात आला नसला तरी पाकिस्तानविरुद्धच्या संभाव्य कारवाईच्या पार्श्वभूमीवर उच्चस्तरीय बैठकांच्या मालिकेत संरक्षण सचिवांसोबतची ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे. पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानच्या सहभागाबद्दल भारताने जी-२० देशाच्या राजदूतांना पुराव्यासह माहिती दिली आहे. दहशतवाद्यांना आणि दहशतवादाची पडद्याआडून सूत्रे हालविणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकविण्याची जाहीर घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यापूर्वीच केली होती. त्यानंतर संभाव्य कारवाईसाठी सरकारने सैन्यदलांना योग्य वेळ आणि योग्य उद्दिष्ट ठरविण्याची मुभा दिली आहे.आतापर्यंत काय?
- सिंधू पाणी वाटप कराराला स्थगिती
- पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द
- आयात- निर्यात व्यापार थांबला
- भारतीय जहाजांना बंदरांत प्रवेश नाही
- तिन्ही सेनादल प्रमुखांच्या बैठका
- सर्वपक्षीय बैठकीत प्रतिहल्ल्याचा निर्धार
- विरोधकांचा सरकारला कारवाईसाठी पाठिंबा

