मुंबई, ५ मे २०२५ : पुण्याचा २३ वर्षीय धावपटू प्रणव प्रमोद गुरव याने कोची येथे २५ एप्रिल रोजी पार
पडलेल्या २८व्या नॅशनल फेडरेशन कप सीनियर अॅथलेटिक्स स्पर्धेत पुरुषांच्या १०० मीटर शर्यतीमध्ये
१०.२७ सेकंदात सुवर्णपदक पटकावले आणि देशाला अचंबित केले. या कामगिरीने त्याने भारतातील
आतापर्यंतच्या सहा सर्वात जलद धावपटूंमधील चार जणांना मागे टाकले असून तो सध्या भारताचा सर्वात
वेगवान १०० मीटर धावपटू ठरला आहे.
भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरव मिळवून देऊ शकणाऱ्या तरुण खेळाडूंना प्रोत्साहन देण्याच्या
उद्देशाने आरबीएल बँकेचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी आर. सुब्रमणियाकुमार
यांनी मुंबईतील बँकेच्या मुख्य कार्यालयात प्रणवचा सत्कार केला आणि त्याच्या उल्लेखनीय कामगिरीचे
कौतुक केले. तरुण प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या वचनबद्धतेचा हा भाग म्हणून बँकेने प्रणवला ५०,०००
रुपयांचे पारितोषिकही दिले.
प्रणवची वाटचाल ही जिद्द आणि उत्कटतेची कहाणी आहे. पुण्याजवळील दौंड येथील रहिवासी असलेल्या
प्रणवने सुरुवातीला कोणतीही योग्य सुविधा वा साहित्य नसताना प्रशिक्षण सुरू केले. स्थानिक स्पर्धेत
१३.५ सेकंदांची धाव घेत त्याने आपली छाप पाडली. बाबुराव सणस स्टेडियमवर त्याने नियमित प्रशिक्षण
घेतले. दररोज १६० किमी प्रवास करत शिक्षणही सांभाळले. एआयएसएसएमएस कॉलेजमधून सिव्हिल
इंजिनीअरिंगची पदवी घेतल्यानंतर तो सध्या भारतीय रेल्वेमध्ये दुसऱ्या श्रेणीचा अधिकारी म्हणून पुण्यात
कार्यरत आहे.
२०२२ मध्ये २३ वर्षांखालील गटात राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण, तर २०२३ आणि २०२५ मधील राष्ट्रीय क्रीडा
स्पर्धेत रौप्यपदक पटकावल्यावर, प्रणव भारतीय अॅथलेटिक्समध्ये एक उगवता तारा म्हणून नावारूपाला
येत आहे.
भारताचा सर्वात वेगवान १०० मीटर धावपटू प्रणव गुरव याचा आरबीएल बँकेने केला सत्कार
Date:

