पुणे महानगरपालिकेत बांधकाम सल्लागार म्हणून काम करणाऱ्या विपुल कुमार चाँदकुमार गर्ग (वय- ५४) यांच्या बाणेर परिसरातील पॅनकार्ड क्लब रस्त्यावर उच्चभ्रू सोसायटी असलेल्या सुप्रीम अॅमडोर येथील फ्लॅट क्रमांक १४०२ मध्ये मागील चार महिन्यापासून एक ३० वर्षीय महिला घरकाम करत होती. सदर महिलेने गर्ग यांच्या घरातील बेडरूम मधील कपाटाच्या ड्रावर मध्ये ठेवलेले २५ लाख ८० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
याप्रकरणी विपुलकुमार गर्ग यांनी बाणेर पोलीस ठाण्यात आरोपी महिलेविरोधात तक्रार दाखल केली आहे. सदरचा प्रकार २७/२/२०२५ ते २७/४/२०२५ यादरम्यान घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित घरकामगार महिला ही गर्ग यांचे घरी मागील चार महिन्यापासून काम करत आहे. तिने घरातील लोकांचा विश्वास संपादन करुन घरातील बेडरूम मध्ये नियमित साफसफाई करत होती. यादरम्यान तिने घरातील लोकांची नजर चुकवून बेडरूममधील कपाटाच्या ड्रावर मध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने घरात काम करत असताना, टप्प्याटप्प्याने चोरी केल्याचा प्रकार घडला आहे. गर्ग कुटुंबीय एका लग्नासाठी जाताना त्यांनी कपाटातील दागिन्यांची पाहणी केली असता ते मिळून आले नाही. त्यामुळे घरकामगार महिलेची विचारपूस केली असता ती पसार झाल्याचे दिसून आले आहे. याप्रकरणी आरोपी महिलेवर गर्ग कुटुंबीयांच्या संमतीशिवाय लबाडीच्या इराद्याने दागिने चोरी केल्याचा गुन्हा बाणेर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांनी दिली आहे.

