पुणे-पुरंदर विमानतळ प्रकल्पाला स्थानिक शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. या विरोधासाठी शनिवारी झालेल्या आंदोलनाने हिंसक वळण घेतले. या पार्श्वभूमीवर सरकारने सध्या तरी पुरंदर विमानतळाच्या सर्वेक्षणाची प्रक्रिया तात्पुरती थांबवण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. आम्ही शेतकऱ्यांना ऑफर देऊ, शेतकऱ्यांनी आम्हाला ऑफर द्यावी. त्यांनी विमानतळ होऊ न देण्याचा हट्ट सोडावा, असेही बावनकुळे म्हणाले.
पुरंदर येथे होणाऱ्या विमानतळाला 7 गावातील ग्रामस्थांचा मोठा विरोध आहे. दोन दिवसांपूर्वी विमानतळाच्या जागेचे सर्वेक्षण करण्यासाठी पथक आले होते. त्यावेळी ग्रामस्थांनी पथकाला सर्वेक्षण करण्यास विरोध करत आंदोलन केले. या दरम्यान, पोलिस आणि ग्रामस्थ यांच्यात धक्काबुक्की होऊन आंदोलनाला हिंसक वळण लागले. यावर आज चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पुरंदर विमानतळाबाबत सुरू असलेले सर्वेक्षण थांबवण्यात आलेले आहे, अशी माहिती बावनकुळे यांनी दिली. शेतकऱ्यांच्या मुळावर उठून आम्हाला काही करायचे नाही. मी याबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे. आमची शेतकऱ्यांना ऑफर आहे, त्यांनी विमानतळ होऊ देणार नाही हा हट्ट सोडावा, असेही ते म्हणाले. पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनाला विरोध असणाऱ्या अनेक मान्यवरांशी आम्ही चर्चा केली. परवा जी घटना घडली त्याचासुद्धा आम्ही आढावा घेतला असून शेतकऱ्यांवर जे गुन्हे दाखल झाले आहेत ते कमी केले पाहिजे, अशी त्यांची मागणी आहे, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
बावनकुळे म्हणाले, पुरंदर विमानतळामुळे पश्चिम महाराष्ट्राचे चित्र बदलणार आहे, शेतकऱ्यांचा माल निर्यात होऊ शकतो, पुण्याच्या विकासाबाबत मुंबई, दिल्लीनंतर नाव येते. त्यामुळे हे संभाव्य विमानतळ करण्याचा मानस आहे आणि ती भूमिका शासनाची बदलणार नाही. मी शेतकऱ्यांना विनंती करतोय की, 7 दिवसात तुम्ही तुमच्या मागण्या काय आहेत हे आम्हाला कळवा. जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या खिशात काय टाकता येईल, अशी भूमिका आम्ही मांडली आहे.
शासन एखादी घोषणा करेल तेव्हा सरकारने आमचे चांगले केले, असे शेतकऱ्यांना वाटेल. आम्ही शेतकऱ्यांना ऑफर देऊ, शेतकऱ्यांनी आम्हाला ऑफर द्यावी, टेबलवर बसून तिढा सुटेल. पुढील 15 दिवसात पुन्हा चर्चा करू, असेही चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
परवा घडलेल्या घटनेचा सुद्धा आढावा आम्ही घेतल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. शेतकऱ्यांवर जे गुन्हे दाखल झाले आहेत ते मागे घेतले पाहिजे अशी त्यांची मागणी आहे. गुन्ह्यात जे लोक प्रत्यक्ष सहभागी आहेत, त्यांचा वेगळा विचार करायला लागेल. जे निरपराध आहेत त्यांचे गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी आहे. मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी उद्या याबाबत चर्चा करेन. असेही बावनकुळे म्हणाले.

