पुणे : ब्राह्मण कार्यालय संस्था शताब्दी वर्ष साजरे करीत आहे. या निमित्ताने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. शताब्दी वर्षानिमित्त पुण्यातील जनकल्याण रक्तपेढी या संस्थेला त्यांच्या आवश्यकतेनुसार साडेसहा लाख रुपये किमतीचा ८०० लिटर साठवण क्षमतेचा आणि दोन अंश तापमानापर्यंत कार्यक्षम असणारा मोठा रेफ्रिजरेटर भेट म्हणून देण्यात आला.
स्वारगेट येथील जनकल्याण रक्तपेढी येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ब्राह्मण कार्यालय संस्थेचे उपाध्यक्ष रमेश भागवत उपस्थित होते. या प्रसंगी जनकल्याण रक्तपेढी तर्फे डॉ. अतुल कुलकर्णी यांनी संस्थेचे आभार मानले. डॉ. माधुरी बर्वे यांनी रक्तपेढीच्या संपूर्ण कामकाजाची माहिती दिली.
डॉ. अतुल कुलकर्णी म्हणाले, ब्राह्मण कार्यालयाच्या वतीने देण्यात आलेल्या नवीन रेफ्रिजरेटरमुळे रक्त साठवणुकीची क्षमता लक्षणीय वाढणार आहे. परिणामी पुणे शहरातील रक्तसाठा व्यवस्थापन अधिक सक्षम होईल. पैशाअभावी रक्त मिळणार नाही, याची आम्ही विशेष काळजी घेतो. थॅलेसेमिया ग्रस्त लहान मुलांना दरवर्षी ४ हजार रक्तपिशव्या रक्तपेढीच्या वतीने विनामूल्य दिल्या जातात, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
रमेश भागवत म्हणाले , ब्राह्मण कार्यालय संस्थेच्या शताब्दी वर्षानिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. जनकल्याण रक्तपेढी यांना त्यांची गरज ओळखून केवळ रक्त पेढीसाठी उपयुक्त असणारा रेफ्रिजरेटर देण्यात आला. नेताजी सुभाषचंद्र बोस शाळेलाही सुरक्षा कॅमेरा बसविण्यात आर्थिक मदत संस्थेमार्फत करण्यात आली आहे. समाजाच्या कल्याणासाठी अशा कार्यात सहभागी होणे ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. भविष्यातही ब्राह्मण कार्यालय संस्था अशाच कार्यासाठी पुढे राहील, असेही त्यांनी सांगितले.

