मराठीचे भाषाविज्ञान महाराष्ट्रातच दुर्लक्षित : प्रा. प्र. ना. परांजपे

Date:

‘सोस्यूर ते चॉम्स्की’ भाषांतरित पुस्तकाचे प्रकाशन
पुणे : बारा कोटी मराठी भाषक असूनही मराठी भाषाविज्ञान हा महत्त्वाचा विषय महाराष्ट्रात दुर्लक्षित आहे. राज्याच्या कुठल्याही विद्यापीठात मराठी भाषाविज्ञान शिकण्याची सोय नाही; कारण मराठी भाषेत ते कुठेही शिकवले जात नाही, अशी खंत ज्येष्ठ भाषातज्ज्ञ प्रा. प्र. ना. परांजपे यांनी व्यक्त केली. ‘मराठीचे भाषाविज्ञान शिकण्याची सोय मराठीमध्येच हवी’, असे आग्रही मतही त्यांनी मांडले.
‘सोस्यूर ते चॉम्स्की’ हे पुस्तक म्हणजे आधुनिक भाषा विज्ञानातील काही मूलभूत निबंधांचे सटीक भाषांतर असून, ज्येष्ठ भाषातज्ज्ञ डॉ. मिलिंद मालशे यांनी भाषांतर केले आहे. लोकवाङ्‌मय गृहतर्फे या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी प्रा. परांजपे बोलत होते. ज्येष्ठ भाषातज्ज्ञ भाषांतरकार डॉ. मिलिंद मालशे तसेच भाषाविज्ञानाचे अभ्यासक डॉ. प्रकाश परब, डॉ.‌ विजया देव हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा.‌ मिलिंद जोशी अध्यक्षस्थानी होते.
डॉ. मालशे म्हणाले, भाषाविज्ञान हे वैज्ञानिक अभ्यास पद्धती वापरणारे विशिष्ट असे अभ्यासक्षेत्र आहे. पाश्चात्य जगात २०व्या शतकात सोस्यूर या स्विस अभ्यासकाने व्याख्यानांतून मांडलेली तत्त्वे आधुनिक भाषाविज्ञानाला पायाभूत ठरली. आणि विविध भाषाभ्यासकांनी त्यावर मंथन करून आपापले विचार निबंध आणि पुस्तक रूपांत मांडले. यामध्ये भारतीय भाषांचाही संदर्भ आहे. मराठी भाषेत हे विचार एकत्रित यावेत, हा भाषांतर करण्यामागचा एक महत्त्वाचा हेतू होता. भाषा ही व्यवस्था असते. तिच्या अनेक पातळ्या असतात. ध्वनी, शब्दरूपे, वाक्य आणि अर्थ अशा अनेक स्तरांवर ही व्यवस्था कशी घडलेली असते याचा अभ्यास व संशोधन भाषाविज्ञानात होते. हे आधुनिक विचारधन मराठीमध्ये आणणे महत्त्वाचे वाटले.
राज्यातील विद्यापीठांमध्ये भाषाविषयक ज्ञान इंग्रजी भाषेत दिले जाते, याविषयी टीका करून प्रा. परांजपे म्हणाले, मराठी भाषेतच मराठी भाषाविज्ञान शिकण्यासाठी चांगली पाठ्यपुस्तकेही उपलब्ध नाहीत. डॉ. मिलिंद मालशे यांनीच लिहिलेले एकमेव पुस्तक भाषाविज्ञानासंदर्भात उल्लेखिले जाते. स्वतः मालशे यांनीच आता दीर्घ काळानंतर पुन्हा एकदा मराठी भाषा विज्ञानासंदर्भातील मौलिक असे नवे पुस्तक वाचकांच्या आणि अभ्यासकांच्या हाती दिले आहे. हा फक्त अनुवाद वा भाषांतर नाही. मराठी वाचकांची तयारी आणि वकूब लक्षात घेत त्यांनी हे भाषांतर केले आहे. त्यातून मराठीच्या विद्यार्थ्यांना, शिक्षकांना, अभ्यासकांना मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळेल’, असे ते म्हणाले.
डॉ. विजया देव यांनी मराठीमधील भाषाविज्ञानविषयक अस्तित्वात असलेल्या लेखनाचा परामर्श घेतला. डॉ. मालशे यांच्या दीर्घकालीन व्यासंगाचे फलित म्हणजे हे पुस्तक आहे. सैद्धांतिक मांडणी आणि उपयोजन, या दोन्हीवरही त्यांची उत्तम पकड असल्याने भाषाविज्ञानाचे क्षेत्र समृद्ध होत राहील.
भाषाविज्ञानासारखा तात्विक आणि अतितांत्रिक विषय भाषांतरित करताना उभे राहिलेले परिभाषेचे आव्हान डॉ. मालशे यांनी कित्येक नवे शब्द घडवून पेलले आहे. आधुनिक भाषाविज्ञान – सिद्धांत आणि उपयोजन या मालशे यांच्याच आधीच्या पुस्तकाचे हे एक जोडपुस्तक आहे. मूळ सैद्धांतिक लेखन वाचकांपर्यंत सुगमतेने नेण्यासाठी डॉ. मालशे यांनी दिलेली तपशीलवार माहिती आणि टीपा, लक्षणीय आहेत. मराठी भाषेसाठी त्यांचे मोलाचे योगदान आहे, असे डॉ. प्रकाश परब म्हणाले. मराठी भाषेसंबंधीचा एक activist म्हणून काम करताना भाषा विज्ञानाचा उपयोग कसा होतो, हे डॉ परब यांनी स्पष्ट केले.
भाषा ही सामाजिक संस्था आहे, असे सांगून अध्यक्षीय समारोपात प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, हे पुस्तक भाषाविज्ञानाचे समग्र भान देणारे आहे. भाषा ही व्यक्ती आणि विश्व यांच्यातील दुवा असते. भाषेवर अनेक घटक परिणाम करत असतात. डॉ. मालशे यांनी या पुस्तकामधून झापडबंद दृष्टीला धक्का देण्याचे कार्य केले आहे. पाश्चात्य भाषातज्ज्ञांनी भाषाव्यवहार आणि भाषा व्यवस्था असा फरक करून मांडणी केली आहे. एकभाषिक समाजातही भाषा व्यवहाराचे स्वरुप एकसारखे नसते. आर्थिक, राजकीय आणि धार्मिक सत्ता असलेला वर्ग समाजावर वर्चस्व गाजवत असतो, हे लक्षात घेतले पाहिजे. भाषेचा अभ्यास म्हणजे केवळ साहित्याचा अभ्यास नाही. साहित्य हे भाषेच्या अनेक रूपांपैकी एक आहे. साहित्यापलीकडे भाषेची जी वेगवेगळी क्षेत्रे असतात त्यांचा अभ्यास भाषाविज्ञानाच्या कक्षेत येतो. भाषाविज्ञान हे एक व्यापक अभ्यासक्षेत्र आहे. भाषेकडे पाहण्याचा बुद्धिवादी दृष्टिकोन स्वीकारणे, भाषेच्या विविध रूपांबद्दल कुतूहल बाळगून अभ्यास करणे, भाषेबद्दलचे खोटे अभिमान टाळून भाषेची अधिकाधिक रहस्ये उलगडण्याची इच्छा बाळगणे, यासाठी भाषाविज्ञान महत्वाचे आहे. डॉ. मिलिंद मालशे यांच्या या पुस्तकामुळे मराठी भाषेच्या अभ्यासकांची भाषा विज्ञानाची समज अधिक व्यापक व सखोल होईल.
पुस्तक लिखाणात सहाय्य करणारे डॉ. मालशे यांचे शिष्य विवेक भट, अर्चना विद्वांस, प्रा. चिन्मय धारुरकर यांनी मनोगत व्यक्त केले.
अर्चना विद्वांस यांनी सूत्रसंचालन केले तर प्रदीप कोकरे यांनी आभार मानले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मुळा-मुठा नदी स्वच्छतेसाठीचे प्रकल्प गतीने पूर्ण करा-मंत्री पंकजा मुंडे

पुणे, दि.११: राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा...

भारतात जन्मलेल्या मादी चित्त्याने कुनो राष्ट्रीय उद्यानक्षेत्राअंतर्गतच्या जंगलातील नैसर्गिक अधिवासात दिला चार पिल्लांना जन्म

मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानक्षेत्राअंतर्गतच्या जंगलातील नैसर्गिक अधिवासात, गामिनी -...

जनगणना २०२७ साठी ४ बॅचेसचे प्रशिक्षण पूर्ण

पुणे, दि.११/४/२०२६ _ :भारताची जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्याअंतर्गत...

उंड्री औताडे हांडेवाडी मध्ये अनधिकृत बांधकामावर पालिकेचा हातोडा

२७,३०० चौरस फूट क्षेत्रावरील नियमबाह्य बांधकामे पाडली. पुणे, दि....