मुंबई-अजित पवार सहाव्यांदा उपमुख्यमंत्री झालेत… मलाही मुख्यमंत्री बनायचे आहे, पण योग जुळून येत नाही, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईत एका कार्यक्रमात आपल्या मनातील भावना व्यक्त केली होती. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. मात्र, आता त्यांनी या विधानावरून यू टर्न घेतला आहे.मी गंमतीत म्हटले होते, मी तसे म्हटले असेल तर माझे शब्द मागे घेतो, असे म्हणत अजित पवारांनी सारवासारव केली.
महायुती सरकारमध्ये अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्री पद आणि अर्थमंत्री पद आहे. मात्र असे असले तरी अजित पवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मुख्यमंत्रिपदाबाबत इच्छा कायम आहे. मुंबईतल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमातही अजित पवारांनी पुन्हा एकदा आपल्या मनातली इच्छा बोलून दाखवत मनातील भावना व्यक्त केली होती. त्यानंतर अनेकांनी यावर प्रतिक्रियाही दिल्या. तर त्यांच्या पक्षातील नेत्यांनी अजित पवारांनी मुख्यमंत्री व्हावे, अशी अपेक्षाही बोलून दाखवली. विधानसभा निवडणुकीच्या आधी अजित पवारांनी किमान पाच वेळा मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण यावेळी त्यांना आपले शब्द मागे घ्यावे लागले.
मुख्यमंत्री पदाबाबत केलेल्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाली. याबाबत पत्रकारांनी अजित पवारांना आज प्रश्न विचारला. त्यावर बोलताना त्यांनी स्पष्टीकरण देत सारवासारव केली. मी गंमतीत म्हटले होते. मी तसे म्हटले असेल तर माझे शब्द मागे घेतो. त्यामुळे आता तो प्रश्न मिटला आहे, असे अजित पवार म्हणाले. कार्यकर्त्यांची इच्छा असली तर 145 आमदारांचा पाठिंबा मिळाला तरच इच्छा पूर्ण होईल. आज देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी 145 पेक्षा जास्त आमदारांचे पाठबळ आहे. त्याआधी एकनाथ शिंदेंना होते, त्याआधी उद्धव ठाकरेंच्या पाठीशी पाठबळ होते, असेही त्यांनी यावेळी म्हटले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे वरळी येथे 1 ते 4 मे कालावधीत महाराष्ट्र राज्य स्थापना दिवस आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या निमित्ताने गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव साजरा होत आहे. त्यात 2 मे रोजी विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला. त्यात अजित पवारांनी मनातील भावना व्यक्त केली. सत्कारमूर्ती महिलेच्या एका वक्तव्याचा धागा पकडत ते म्हणाले, मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं. पण कुठं जमतंय. कधी ना कधी सीएमपदाचा योग येईल. योग येणारच नाही असे नाही. महिलांना उद्देशून पवार यांनी सांगितले की, ममता बॅनर्जी पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री झाल्या. जयललितांनी स्वत:च्या तमिळनाडूत ताकदीवर राज्य मिळवले. हा शिव, शाहू, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, इथंही महिला मुख्यमंत्री होऊ शकते.
दरम्यान, अजित पवार यांनी आतापर्यंत पाचवेळा उपमुख्यमंत्री पद भूषवले आहे. सध्या त्यांची सहावी टर्म आहे. अजित पवार 2010 मध्ये काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाले. त्यानंतर 2012 साली काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडी सरकारमध्ये त्यांना पुन्हा एकदा उपमुख्यमंत्रिपदाची संधी मिळाली. नोव्हेंबर 2019 मध्ये अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पहाटेच उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. यावेळी ते फक्त 80 तास उपमुख्यमंत्री राहिले होते. त्यानंतर महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर अजित पवार पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री पदी विराजमान झाले. अडीच वर्षे ते या पदावर होते. 2022 सालीच अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंड केले आणि भाजपासोबत सत्तेत सामील झाले. यावेळी पाचव्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची माळ अजित पवारांच्या गळ्यात पडली. आता महायुती सरकारमध्ये ते सहाव्यांदा उपमुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आहेत.

