फॉरेस्ट पार्क व गोठण ओढा मार्गे जाणाऱ्या ३०० मीटरचा रस्ता करण्यासाठी झोपलेल्या महानगरपालिका प्रशासनाला आमदार बापूसाहेब पठारे यांच्या आमरण उपोषणाने खडबडून जाग
पालिका प्रशासनाची दखल; काम सुरू
लोहगाव, पुणे: लोहगाव–वाघोली मुख्य रस्त्याला जोडणाऱ्या फॉरेस्ट पार्क व गोठण ओढा मार्गे जाणाऱ्या अवघ्या ३०० मीटर अपूर्ण रस्त्याच्या कामासाठी अखेर वडगावशेरीचे आमदार बापूसाहेब पठारे यांनी २ मे रोजी सकाळी ८.३० वाजता आमरण उपोषण सुरू केले. गेली ८-१० वर्षे या रस्त्याची मागणी होत असतानाही पुणे महापालिकेच्या निष्क्रियतेमुळे या रस्त्याचे काम रखडले होते.
सदर अपूर्ण रस्त्यामुळे नागरिक, शाळकरी विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, रुग्णवाहिका यांना दररोज मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. या रस्त्यावर अपघात, मणक्यांचे त्रास आणि सार्वजनिक वाहतूक अडथळ्यांमुळे नागरिकांमध्ये प्रचंड अस्वस्थता होती. तरीही पालिका प्रशासन दुर्लक्ष करत होते.
याविरोधात ठाम भूमिका घेत वडगावशेरी मतदारसंघाचे आमदार बापूसाहेब पठारे यांनी थेट रस्त्याच्या ठिकाणी उपोषण सुरू केले. नागरिकांनी, कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने पाठिंबा दर्शवला. “गेली ८-१० वर्षे या रस्त्याकडे कोणतेही अधिकारी गांभीर्याने बघायला तयार नाहीत. मालक तयार असूनही मोजणी, कागदपत्रे आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीत प्रशासन कुचराई करतेय. नागरिकांचे जीवन धोक्यात असतानाही, ‘करतो’, बघतो, ‘पाहतो’, इतकेच उत्तर मिळतेय आणि ही मानसिकता मान्य नाही,” अशी थेट टीका आमदार बापूसाहेब पठारे महापालिका प्रशासन व अधिकारी वर्गावर केली.
उपोषणाच्या अवघ्या काही तासांतच प्रशासनाने हालचाल सुरू केली. पुणे महानगरपालिका पथविभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर, परिमंडळ १ चे उपआयुक्त राजेंद्र जगताप, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता राजेश भुतकर, पथविभागाचे कार्यकारी अभियंता संजय धारव यांच्यासह संबंधित अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून कामास सुरुवात केली. मात्र, फक्त वरवर पाहणी व सुरुवात पुरेशी नसल्याचे स्पष्ट करत आमदार पठारे यांनी उपोषण मागे घेण्यास स्पष्ट नकार दिला होता. जोपर्यंत रस्ता पूर्ण होत नाही, तोपर्यंत हे आमरण उपोषण सुरूच राहील, असेही त्यांनी ठामपणे सांगितले होते.
यानंतर संध्याकाळी उशिरा अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांच्या उपस्थितीत लवकरात लवकर काम पूर्ण होईल, अशी हमी दिल्यानंतर पठारे यांनी १२ तासांनी उपोषण मागे घेतले. तथापि, उपोषण मागे घेताना पठारे यांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला, की “फक्त काम सुरू झाले म्हणून मी शांत बसणार नाही. जोपर्यंत हा रस्ता पूर्ण होणार नाही, नागरिकांना प्रत्यक्ष डांबरीकरण झालेला चालण्यायोग्य रस्ता मिळणार नाही, तोपर्यंत लक्ष ठेवणार आहे. काम वेळेत आणि मुख्य म्हणजे दर्जा राखून पूर्ण झाले पाहिजे.”
नागरिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या व्यवस्थेला जागे करायचे असेल, तर संघर्षाची ठिणगी पेटवावीच लागते. आमदार बापूसाहेब पठारे यांनी तो संघर्ष वारंवार आपल्या प्रत्यक्ष कृतीतून दाखवला. उपोषणाला यश आल्याबद्दल व काम सुरू झाल्याबद्दल नागरिकांनी आमदार बापुसाहबे पठारे यांचे अभिनंदन व आभार मानले. तसेच, सर्वत्र या यशस्वी उपोषणाची चर्चा होत असल्याचे समजते.

