पुण्यातील लोहगाव-खराडी या दोन्ही परिसरांना जोडणाऱ्या अवघ्या तीनशे मीटरच्या रस्त्यासाठी आमदार बापू पठारे यांनी संतप्त होत आमरण उपोषण छेडलं आहे. रस्त्याचे काम जोपर्यंत होत नाही तोपर्यत आमरण उपोषण सुरु राहणार असे पठारे यांनी म्हटलं आहे.आज सकाळी दहा वाजल्यापासून बापू पठारे हे त्यांचे काही कार्यकर्ते आणि स्थानिकांसोबत या तीनशे मीटर रस्त्याजवळ आंदोलनाला बसले आहेत. या रस्त्याबाबत तक्रार करायला गेलं की या विभागाचे अधिकारी बघू, करू असं म्हणतात पण आता जोपर्यंत या रस्त्याचे डांबरीकरण होत नाही, तोपर्यंत मी असाच बसून राहणार असा पावित्र्य पठारे यांनी घेतला आहे. उपोषणासंदर्भात पठारे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली आहे.
लोहगाव-वाघोली रस्त्याला जोडणाऱ्या फॉरेस्ट पार्क, गोठण ओढा मार्गे जाणाऱ्या रस्त्यावरील केवळ ३०० मीटर अंतराचा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. नागरिक, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णवाहिकांना दररोज या रस्त्याच्या अपूर्णतेमुळे मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.वारंवार निवेदने, मागण्या आणि पाठपुरावा करूनही पुणे महानगरपालिकेने दुर्लक्ष केल्यामुळे आता मी या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून आज सकाळी ८.३० वाजता त्याच लोहगाव येथील ३०० मीटर रस्त्यावर आमरण उपोषण सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. असं पठारे यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

