पुणे-पुण्यातील विश्रामबाग पोलिस ठाण्यात पोलीस फौजदार विराज गावडेंवर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाची हकीकत मोठी रंजक आणि समाजाच्या डोळ्यात अंजन घालणारी ठरू शकेल अशी असल्याचे सध्या तरी दिसते आहे पीडित तरुणीने विश्रामबाग पोलिस ठाण्यात या फौजदारा विरोधात फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या तक्रारीनुसार , पोलिस उपनिरीक्षक विराज गावडे (वय ३२, रा. गोखळी, ता. फलटण, जि. सातारा), त्याचा भाऊ कुणाल गावडे तसेच वडील गजानन गावडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सहायक पोलिस आयुक्त अनुजा देशमाने पुढील तपास करत आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पोलिस उपनिरीक्षक विराज गावडे हा पुण्यात पूर्वी स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. २०२० मध्ये त्याची पीडित तरुणी सोबत ओळख निर्माण होऊन त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. दोघांनी नोंदणी पद्धतीने विवाह देखील केला.परंतु ही बाब त्याने कुटुंबीय, मित्रांपासून लपवली. पीडित तरुणीला पत्नीप्रमाणे दर्जा दिला नाही. तरुणीने याबाबत त्याच्याकडे विचारणा केली त्यावेळी कुटुंबीयांना विवाहाबद्दलची माहिती देतो, असे सांगून विराज याने तरुणीकडून वेळोवेळी विविध कारणे सांगत १० ते १२ लाख रुपये घेतले आणि तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले.
दरम्यान, विराज याची पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाली. पीडित तरुणीने त्यानंतर त्याच्याकडे लग्न झाल्याचे घरी सांग अशी विचारणा केली. कुटुंबीयांशी ओळख करुन दे, अशी विनंती तिने केली. त्यावेळी त्याने टाळाटाळ सुरू केली. ‘माझे कुटुंबीय माझ्याशी स्थळ पाहत आहेत. तू खालच्या जातीची आहे. आपला विवाह कुटुंबीय मान्य करणार नाही. माझा विचार सोडून दे’, असे त्याने तिला सांगितले. त्याने तरुणीला भेटण्यास टाळाटाळ सुरू केली. त्याचे वडील गजानन आणि भाऊ कुणाल यांनी देखील यासाठी त्याला साथ दिली. मला वडिलांच्या जागेवर चंद्रपूर येथे नोकरी मिळणार होती. विराजच्या सल्ल्यामुळे मी नोकरी नाकारली. आज मला नोकरीही नाही, तसेच विराजने माझी फसवणूक केली. मला धमकावून गर्भपात केला, असे पीडित तरुणीने तक्रारीत सांगितले आहे.

