पुणे-महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार बारावी बोर्डाचा निकाल पुढील महिन्यात 13 तारखेला लागणार असल्याची माहिती आहे. त्यानंतर 15-16 तारखेला दहावीचा निकाल अपेक्षित असल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले आहे. त्यामुळे या दोन्ही इयत्तांचा निकाल केव्हा लागणार? हे जवळपास स्पष्ट झाले आहे.
यंदा 11 फेब्रुवारी ते 11 मार्च या कालावधीत बारावीची परीक्षा पार पडली होती. त्यानंतर 21 ते 17 मार्च या कालावधीत दहावीचे विद्यार्थी अग्निपरीक्षेला सामोरे गेले होते. या परीक्षेनंतर बोर्डाने ठरवून दिलेल्या निश्चित कालावधीत सर्वच शिक्षकांनी उत्तरपत्रिका तपासणीचे काम पूर्ण केले. सध्या गुणांची अंतिम पडताळणीचे काम सुरू आहे. त्यानंतर 13 मे रोजी इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर होईल. तर दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल 15 किंवा 16 मे रोजी जाहीर होईल. त्याची अधिकृत घोषणा राज्याचे शिक्षणमंत्री करतील, अशी माहिती पुणे विभागीय मंडळाचे अध्यक्ष औदुंबर उकिरडे यांनी दिली आहे.
अधिकाऱ्यांच्या मते, चालू आठवड्यात गुण पडताळणीचे काम पूर्ण होऊन गुणपत्रिकांची छपाई सुरू होईल. यासंबंधीचे सर्व कामकाज 11 मेपर्यंत पूर्ण होईल. त्यानंतर निकाल ऑनलाईन पद्धतीने जारी केला जाईल. हा निकाल विद्यार्थ्यांना घरबसल्या पाहता येईल. यासंबंधीच्या वेबसाइट्सची माहिती पुढील आठवड्यात बोर्डाकडून सार्वजनिक केल्या जातील. निकालानंतर विद्यार्थ्यांना पुढील प्रवेशाचे अचूक नियोजन करणे सोयीचे ठरणार आहे.
गतवर्षी 21 मे रोजी लागला होता बारावीचा निकाल
उल्लेखनीय बाब म्हणजे गतवर्षी बारावीचा निकाल 21 मे रोजी जाहीर झाला होता. त्यानंतर आठवड्याभराने म्हणजे 27 मे रोजी दहावीचा निकाल लागला होता. दहावी व बारावी या दोन्ही परीक्षांत उत्तीर्ण होण्यासाठी प्रत्येक विषयात किमान 35 टक्के गुण आवश्यक असतात. याशिवाय विद्यार्थ्यांना ग्रेडही दिले जातात. ग्रेडिंग व्यवस्थेनुसार, 75 टक्के व त्याहून अधिक गुण मिळवणाऱ्यांना डिस्टिंक्शन मिळणार आहे.
बारावीचे विद्यार्थी
15.24 लाख
दहावीचे विद्यार्थी 16.39 लाख
एकूण विद्यार्थी संख्या 31.63 लाख

