मुंबई- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवारी अखेर अक्षय्य तृतीयेचे मुहूर्त साधत वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत शासकीय निवासस्थानी राहण्यासाठी गेलेत. देवेंद्र फडणवीस यांनी गतवर्षी 5 डिसेंबर रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून पद व गोपनीयतेची शपथ घेतली होती. पण तेव्हापासून ते ‘सागर’ या आपल्या जुन्याच निवासस्थानी राहत होते. कारण, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा बंगला सोडला नव्हता. त्यामुळे मुख्यमंत्री वर्षा बंगल्यावर केव्हा राहण्यास जाणार? असा प्रश्न सातत्याने विरोधकांकडून उपस्थित केला जात होता. अखेर अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर फडणवीस यांनी वर्षा बंगल्यात सपत्नीक गृहप्रवेश केला. अमृता फडणवीस यांनी एका पोस्टद्वारे या गृहप्रवेशाची माहिती दिली. तसेच काही फोटोही शेअर केले.
सर्वांना अक्षय तृतीयेनिमित्त हार्दिक शुभेच्छा. आजच्या शुभमुहूर्तावर वर्षा या निवासस्थानी आम्ही छोटीशी पूजा संपन्न करीत गृहप्रवेश केला. आजच्या दिवशीची आणखी एक अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सर्वांना सांगताना मन खुशीने भरून गेलंय, आमची सुकन्या दिविजा ही 10 वी च्या बोर्ड परीक्षेत 92.60 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाली आहे, असे अमृता फडणवीस यांनी एका पोस्टद्वारे सांगितले आहे.
उल्लेखनीय बाब म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वीच मुलीच्या दहावीच्या परीक्षेमुळे आपण अजून वर्षा बंगल्यावर राहण्यासाठी गेलो नसल्याचे सांगितले होते. एकनाथ शिंदे यांनी वर्षा बंगला सोडल्यानंतर आम्ही तिथे जाऊ. तिथे काही छोटी-मोठी कामेही होणार आहेत. सध्या माझी मुलगी दिविजा दहावीमध्ये शिकत आहे. ती म्हणाली की, माझी परीक्षा झाल्यानंतरच आपण तिकडे शिफ्ट होऊ. त्यामुळे आम्हालाही या प्रकरणी फार काही घाई नाही, असे ते म्हणाले होते.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यात न जाण्याविषयी एक वेगळाच दावा केला होता. वर्षा बंगल्यात रेड्याची शिंगे पुरली आहेत. कुणीतरी जादूटोण्याचा प्रकार केला आहे. त्यामुळेच देवेंद्र फडणवीस तिकडे राहण्यासाठी जाण्यास तयार नाहीत, असे ते एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना म्हणाले होते. त्यांच्या या दाव्याची राजकीय वर्तुळात खंग चर्चा रंगली होती. पण आता मुख्यमंत्र्यांनी अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर वर्षा बंगल्यात प्रवेश केल्यामुळे हा विषय संपला आहे.

