विदर्भ महेश असोसिएशन आणि फ्रेंड्स ऑफ ट्रायबल सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने व्याख्यान
पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या निधनानंतर समर्थ रामदास स्वामी यांनी छत्रपती संभाजी महाराज यांना लिहिलेल्या पत्रात ‘शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचे आठवावा प्रताप श्रीमंतयोगी’ अशा शब्दांत शिवरायांच्या कार्याचे स्मरण ठेवून वाटचाल करण्याचा सल्ला दिला होता. त्याच धर्तीवर आजच्या काळातही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांची आणि कार्याची प्रेरणा घेणे अत्यंत आवश्यक आहे. याच प्रेरणेतून उद्याचा बलशाली हिंदुस्तान घडेल, असा विश्वास प.पू. स्वामी श्री गोविंद देव गिरी महाराज यांनी व्यक्त केला.
विदर्भ महेश असोसिएशन, पुणे आणि फ्रेंड्स ऑफ ट्रायबल सोसायटी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने चिंचवड येथील रामकृष्ण मोरे सभागृहात आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज – एक दृष्टा नेता’ या विषयावरील व्याख्यानात स्वामीजींनी आपले विचार मांडले. या प्रसंगी विनीत राठी, वसंत राठी, राधेश्याम गर्ग, मनोज बेहेडे, दिनेश मुंदडा, स्वप्नील काबरा आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात सुरेश सोडानी, जुगलकिशोर पुंगलिया, अजय किशोर लड्ढा, अशोक करवा, राधेश्याम गर्ग आणि जगदीश कदम यांचा सन्मान करण्यात आला.
स्वामी गोविंद देव गिरी महाराज म्हणाले, “रामायण व महाभारत यांतील सदगुणांचे संपूर्ण एकत्रीकरण केले तर त्यातून छत्रपती शिवाजी महाराज यांचे अद्वितीय व्यक्तिमत्त्व निर्माण होते. महाराष्ट्राच्या मातीत छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाल्याचा अभिमान प्रत्येकाने बाळगावा. तथापि, काही काळापूर्वी पर्यंत छत्रपतींच्या इतिहासाचे अपूर्ण आणि अप्रामाणिक चित्रण झाले होते. आजच्या पिढीसमोर त्यांच्या जीवनाचा खरा इतिहास पोहोचविणे ही काळाची गरज आहे.”
ते पुढे म्हणाले, “आजच्या तरुणांमध्ये स्वाभिमान जागवणे अत्यावश्यक आहे आणि हे स्वाभिमान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेशिवाय जागृत होऊ शकत नाही. म्हणूनच मी रामायणातील प्रभू श्रीराम, महाभारतातील श्रीकृष्ण यांच्या बरोबर छत्रपती शिवाजी महाराज यांच्याही कथा व्यासपीठावर मांडतो. त्यातून आजच्या तरुणांना प्रेरणा मिळते. तरुण पिढीने स्फुरण पावून चांगल्या कार्यासाठी सज्ज व्हावे आणि बलशाली भारत घडवावा, हेच माझेही स्वप्न आहे.”
याच कार्यक्रमाच्या औचित्याने पुणे चॅप्टरचे अध्यक्ष वसंत राठी यांनी आपले नेतृत्व मनोज बेहेडे यांच्याकडे सुपूर्त केले. प.पू. स्वामी श्री गोविंद देव गिरी महाराज यांच्या शुभहस्ते मनोज बेहेडे यांना नेतृत्वाची सूत्रे प्रदान करण्यात आली व त्यांच्या कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. येथे उल्लेखनीय आहे की, वसंत राठी यांचा कार्यकाळ अत्यंत यशस्वी व ऊर्जावान ठरला. त्यांच्या प्रभावी नेतृत्वाखाली पुणे चॅप्टरने केवळ प्रगतीच साधली नाही, तर १८० शाळांपासून सुरुवात करून ८०० शाळांपर्यंत आपले कार्यक्षेत्र विस्तारले आणि संघटनेला नव्या उंचीवर नेले.

