निकालामुळे पुणेकर आनंदित
पुणे -सतत खोटे आरोप करीत विरोधकांचे चारित्र्य हनन करीत सत्ता मिळवणे व अशा अभद्र पद्धतीने मिळवलेली सत्ता टिकवण्यासाठी पुन्हा खोटे बोलत राहणे ही भारतीय जनता पक्षाची कूटनीती आज पूर्णतः उघडी पडली. माजी रेल्वे राज्यमंत्री व पुण्याच्या विकासाला दिशा आणि गती देणारे नेतृत्व पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांच्यावरील ईडीने केलेले आरोप आता मागे घेतले व न्यायालयाने देखील ते मान्य केले. या ऐतिहासिक निर्णयामुळे ‘सत्यमेव जयते’ याची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे. असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष व माजी आमदार मोहन जोशी यांनी आज केले.
मोहन जोशी म्हणाले की, पुण्याचा भरभक्कम विकास करीत पुण्याच्या विकासाचा सुवर्णकाळ निर्माण करणारे, देशात क्रीडा संस्कृती रुजवणारे आणि विविध उपक्रमांद्वारे पुण्याला आंतरराष्ट्रीय नकाशावर नेणारे माजी खासदार सुरेश कलमाडी यांच्यावर खोटे आरोप करीत भारतीय जनता पक्षाने नक्की काय साधले? भाजपने माजी खासदार सुरेश कलमाडी यांचे राजकीय करिअर, पुण्याचा विकास आणि देशातील ऑलिम्पिक चळवळीचा कटकारस्थाने रचून घात केला हे देश आणि पुणेकर कधीच विसरणार नाहीत व या पापाबद्दल भारतीय जनता पक्षाला क्षमाही करणार नाहीत.
मोहन जोशी पुढे म्हणाले की, साऱ्या देशाला अभिमान असणारे दिवंगत पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर कोळसा खाण संधर्भात खोटे आरोप करायचे, दिल्लीतील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांसंदर्भात खोटे व बेछूट आरोप करून तत्कालीन मुख्यमंत्री शीला दीक्षित यांना बदनाम करायचे, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ७० हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याच्या आरोळ्या ठोकत राहायच्या, २G प्रकरणात १ लाख ७6 हजार कोटी रुपयांचा भ्रष्टचार झाल्याचे धादांत खोटे बोलत राहायचे. रॉबर्ट वड्रा यांच्यावर असेच बेछूट खोटे आरोप करत राहायचे आणि हे सारे कश्यासाठी? तर भारतीय जनता पक्षाला सत्ता मिळवण्यासाठी व टिकवण्यासाठी! भारतीय संसदीय राजकारणाची नितिमत्ता रसातळाला नेणाऱ्या भारतीय जनता पक्षाने सत्ता मिळवण्यासाठी जनतेशी द्रोह सातत्याने केला.
आता मात्र ‘सत्यमेव जयते’ या पवित्र युक्तीची चपराक भाजपला बसली. असे सांगून मोहन जोशी म्हणले की, कोळसा खाण, २G, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा, रॉबर्ट वड्रा या संदर्भात भ्रष्टचाराचे कोणतेच आरोप सिद्ध होऊ शकले नाहीत अर्थात त्याबद्दल भारतीय जनता पक्षाला खोट्या आरोप व प्रचाराबाबत काडीचीही शरम वाटणार नाही. कारण सत्ता मिळवणे हे एकमेव ध्येय त्यांचे होते. भारतीय जनतेला आता त्यांचा सत्ता पिपासूं क्रूर व जनविरोधी चेहरा दिसून आला असून सत्तेमध्ये धुंद राहिलेल्या भारतीय जनता पक्षाच्या राजवटीने पहलगाम सारख्या ठिकाणी देखील सुरक्षे बाबत ढिलाई व बेफिकिरी का दाखवली हा प्रश्न जनता विचारातच राहणार.
काँग्रेस पक्षाने सदैव नितिमत्ता व साधन सूचिता यांचे पावित्र्य मानले. ‘सत्यमेव जयते’ हे ब्रीदवाक्य शिरोधार्य मानले. असे सांगून मोहन जोशी म्हणाले की, गेल्या दशकातील भारतीय जनता पक्षाच्या कुटील कारस्थानी राजवटीला आणि विकृत मानसिकतेला ‘सत्यमेव जयते’ हेच एकमेव उत्तर आहे. सत्याचा विजय हा उशिरा झाला तरी तोच अंतिम असतो हे कटकारस्थानी भारतीय जनता पक्षाच्या नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व स्वयंसेवक यांनी लक्षात ठेवावे.

