पुणे, 28 एप्रिल 2025 : एका भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या सहा वर्षांच्या चिमुकल्याला ज्युपिटर हॉस्पिटल, बाणेर, पुणे येथील तज्ज्ञ डॉक्टरांच्या कौशल्यपूर्ण आणि बहुवैद्यकीय (मल्टिडिसिप्लिनरी) उपचार पद्धतीमुळे नवे जीवन मिळाले आहे. श्रीरामपूरहून अतिगंभीर स्थितीत व्हेंटिलेटरवर आणलेल्या या मुलावर काही आठवड्यांत अनेक क्लिष्ट शस्त्रक्रिया करण्यात आल्या.
या अपघातात मुलाचा उजवा हात पूर्णपणे गमावला, पोटाची भिंत फाटली, यकृत व मूत्रपिंडावर (लिव्हर व किडनी) गंभीर इजा झाली आणि दोन्ही मांडीच्या हाडांना फ्रॅक्चर झाले होते. जीव वाचवण्यासाठी त्वरीत आणि योग्य उपचारांची गरज होती. मुलाला हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर पहिल्या सहा तासांतच शस्त्रक्रिया करण्यात आली, ज्यामुळे संक्रमणाचा धोका कमी करण्यात मदत झाली.
डॉ. तेजस हम्बीर, कन्सल्टंट – पीडियाट्रिक्स व निओनेटल इंटेंसिव्हिस्ट, यांनी सांगितले, “मुलाची अवस्था फारच गंभीर होती, पण आम्ही त्वरीत ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन त्याच्यावर प्राथमिक शस्त्रक्रिया केली. यामुळे त्याला सावरायला मदत झाली आणि पुढील टप्प्यांसाठी आम्ही त्याला तयार करू शकलो.”
डॉ. स्वप्ना आठवले, कन्सल्टंट – प्लास्टिक सर्जरी, म्हणाल्या, “तत्काळ सर्जरी व अँटिबायोटिक उपचारामुळे संसर्ग टाळण्यात यश आले. पोटाची भिंत आणि हाताचा भाग पूर्णपणे दूषित होता, पण योग्य व्यवस्थापनामुळे आम्ही संसर्ग आटोक्यात ठेवू शकलो.”
या मुलाच्या उपचारात विविध क्षेत्रातील तज्ज्ञांनी सहभाग घेतला –
डॉ. राजीव निरवणे (पीडियाट्रिक ऑर्थोपेडिक्स), डॉ. अभिजीत बेनारे (पीडियाट्रिक सर्जरी), डॉ. सुजाता (इन्फेक्शस डिसीजेस), डॉ. शिवहर सोनवणे (पीडियाट्रिक्स व निओनेटल इंटेंसिव्हिस्ट), डॉ. भाग्यश्री अर्भी (अॅनेस्थेशिया) – यांनी परिपूर्ण समन्वय साधत उपचार केले.
ज्युपिटर फाऊंडेशन आणि मुख्यमंत्री निधीतून आर्थिक मदत देखील दिली गेली, ज्यामुळे कुटुंबावरचा आर्थिक ताण कमी झाला.
तीन आठवडे रुग्णालयात उपचार घेऊन आणि चार मोठ्या शस्त्रक्रियांच्या नंतर, हा चिमुकला बिनधोक घरी परतला – चेहऱ्यावर हास्य आणि मनात जिंकण्याची उमेद घेऊन! त्याची संघर्षशीलता आणि धैर्य हे अनेकांसाठी प्रेरणादायी ठरले आहे.
ही कहाणी केवळ वैद्यकीय कौशल्याची नाही, तर माणुसकीच्या भावनेने प्रेरित झालेल्या उपचारांची आहे – आणि अशा सेवाभावातूनच खरं आरोग्यसंपन्न समाज घडतो!

