मुंबई-दक्षिण मुंबईतील फोर्ट परिसरातील बलार्ड इस्टेटमधील कैसर-ए-हिंद इमारतीच्या चौथ्या मजल्यावर मध्यरात्री दोन अडीचच्या सुमारास भीषण आग लागली. सक्तवसुली संचालनालयाचे कार्यालय या इमारतीत आहे.आग विझवण्याचे काम मुंबई अग्निशमन दलाकडून सकाळी देखील सुरु आहे.फोर्ट परिसरात बेलार्ड इस्टेट परिसरात असलेल्या या इमारतीत शनिवारी मध्यरात्री २ वाजल्यानंतर ही आग लागली. आग लागल्यावर अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. आगीचे गांभीर्य वाढल्यामुळे आग दोन आणि तीन स्तराची असल्याचे घोषित करण्यात आले.
आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी घटनास्थळी ८ अग्निशमन इंजिन, ६ जंबो टँकर, १ एरियल वॉटर टॉवर टेंडर, १ ब्रीदिंग अॅपरेटस व्हॅन,१ वॉटर क्विक रिस्पॉन्स वाहन आणि १०८ रुग्णवाहिका असा मोठा ताफा तैनात आहे. तसेच वरिष्ठ अधिकारी व अग्निशमन दलाचे अधिकारीही घटनास्थळी उपस्थित आहेत.आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू असून कोणतीही जखमी किंवा जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप प्राप्त झालेली नाही. आग नेमकी कशामुळे लागली, याचा तपास सुरू आहे.

