नवी दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लब येथे ‘कोरेगांव लढाईचे वास्तव या पुस्तकाचे प्रकाशन
नवी दिल्ली, २६ एप्रिल २०२५-
“१ जानेवारी १८१८ – भीमा कोरेगांव लढाईची वास्तविकता” या पुस्तकाच्या प्रकाशन नवी दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लब येथे झाले. या कार्यक्रमाला लेखक गुरुप्रकाश पासवान, जेएनयूचे प्राध्यापक डॉ. उमेश कदम आणि पुस्तकाचे लेखक ॲडव्होकेट रोहन जमादार माळवदकर उपस्थित होते.
पुस्तकाचे लेखक ॲड. रोहन जमादार माळवदकर म्हणाले की, त्यांचे पूर्वज १८१८ च्या भीमा-कोरेगांव लढाईत सहभागी झाले होते. ही लढाई ना जातीयवादी होती, ना जाती निर्मूलनासाठी लढली गेली; ही लढाई म्हणजे ब्रिटिश आणि मराठ्यांमधील राजकीय संघर्ष होता. दोन्ही सैन्यांमध्ये विविध जाती आणि धर्मांचे सैनिक सामील होते.
त्यांनी पुढे स्पष्ट केले की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या आयुष्यात फक्त एकदाच, १९२७ मध्ये जयस्तंभाला भेट दिली होती. ही भेट ब्रिटिशांच्या अन्यायकारक आणि जातीयवादी धोरणांच्या विरोधात होती. त्या वेळी ब्रिटिशांनी “मार्शल रेस” सिद्धांताखाली अनुसूचित जातीच्या लोकांची सैन्यात भरती बंद केली होती. डॉ. आंबेडकरांनी या अन्यायाच्या विरोधात जयस्तंभावर जाऊन ब्रिटिशांना ही बंदी हटवण्याचे आवाहन केले होते.
माळवदकर म्हणाले की, या लढाईचे संचालन ब्रिटिश अधिकाऱ्यांनीच केल होते आणि या लढाईशी आणि जयस्तंभाशी संबंधित खरे प्राथमिक अहवाल आणि दस्तऐवज उपलब्ध आहेत. परंतु, काही फुटीरतावादी गट या लढाईला जाणीवपूर्वक जातीयवादी रंग देऊन समाजात फूट पाडत आहेत. त्यांनी नमूद केले की, २०१८ मध्ये महाराष्ट्रात एल्गार परिषदेद्वारे देशविरोधी तत्त्वांना एकत्र आणून दंगल भडकवण्यात आली होती.
जेएनयूचे प्राध्यापक डॉ. उमेश कदम म्हणाले की, ब्रिटिशांनी भारताचा इतिहास वसाहतवादी दृष्टिकोनातून लिहिण्याचे पाप केले. मुद्दामून ‘हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया’ आणि ‘हिस्ट्री ऑफ मुघल इंडिया’ असे इतिहास लिहिले गेले, परंतु ‘हिस्ट्री ऑफ मराठा इंडिया’ लिहिला गेला नाही. यामागे भारताला अस्थिर करण्याचा वसाहतवादी कट आहे.
त्यांनी नमूद केले की, १९६५ नंतर भारतात फुटीरतावादी चळवळींना बळ मिळाले आणि १९६५ नंतर शिकवला गेलेला इतिहास हे त्याचे एक कारण असू शकते. त्यामुळे आता प्रत्येक स्तरावर ब्रिटिशांची वसाहतवादी विचारसरणी नष्ट करणे आवश्यक आहे. यासाठी समाजाने छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडून प्रेरणा घ्यावी.
या प्रसंगी गुरुप्रकाश पासवान म्हणाले की, लेखक रोहन माळवदकर हे ‘जयस्तंभाचे वंशज आहेत, त्यामुळे या विषयावरील त्यांचे लेखन आणखी महत्त्वाचे ठरते. सध्या दलित कल्याणाच्या नावाखाली समाजात वैमनस्य पसरवण्यासाठी एक ‘उद्योग’ सक्रिय आहे. परंतु, त्यांना हे काम कोणी दिले, हा प्रश्नही उपस्थित केला पाहिजे.
पासवान यांनी पुढे सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा अनेकदा विपर्यास केला जातो आणि दुरुपयोग केला जातो. काही विशिष्ट गट त्यांच्या लिखित विचारांचा आपल्या अजेंड्याला अनुरूप वापर करतात. काही वेळा ‘ब्रेकिंग इंडिया’ अजेंडा असलेले तत्त्व दलितांना हिंदूंपासून वेगळे दाखवण्याचा प्रयत्न करतात, ज्यामुळे ‘जय भीम, जय मीम’ सारख्या घोषणा निर्माण होतात. त्यामुळे अशा ठेकेदारांना वेळीच ओळखणे गरजेचे आहे.

