पुणे –जागतिक पातळीवर भारताचे आणि देशपातळीवर अमरावतीची ओळख निर्माण करणाऱ्याभारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती हा बहुमान मिळवणाऱ्या श्रीमती प्रतिभाताई पाटीलयांचे नाव अमरावती विमानतळास द्यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहराध्यक्ष श्री. दीपक मानकर यांनी केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, राष्ट्रीय अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहराध्यक्ष श्री. दीपक मानकर यांनी निवेदनात म्हंटले आहे की, अमरावतीकरांची विमानतळाची स्वप्नपूर्ती झाली आणि पहिल्या विमानाने मुंबईहून अमरावतीकडे प्रवास केला, त्याबद्दल महायुती सरकारचे मनापासून खूप खूप आभार. अमरावतीची ओळख ही थोर स्वातंत्र्यसंग्राम सेनानी देशभक्त दादासाहेब खापर्डे, स्वातंत्र्यलढ्यात स्वत:ला झोकून देणारे क्रांतिकारी वीर वामनराव जोशी, देशाचे पहिले कृषी मंत्री डॉ.पंजाबराव देशमुख, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, कर्मयोगी संत गाडगे महाराज यांच्या नावाने कायम आहे. मात्र यामध्ये आणखी एक नाव आवर्जून जोडले जाते ते म्हणजे भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई देविसिंह पाटील यांचे. आपला देश कायमच नेतृत्वाच्या बाबतीत भाग्यवान ठरला. स्वातंत्र्यानंतर भारताचा संपूर्ण कारभार नेहमीच योग्य नेतृत्वानी सांभाळल्याने आज जगात भारताचे नाव हे विकसनशील देशांमध्ये सर्वात पुढे आहे. त्यात प्रामुख्याने आपल्या देशाला अनेक हुशार कर्तृत्वान महिलांचे देखील नेतृत्व लाभले. या महिलांच्या नेतृत्वानेदेखील त्यांच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर भारत देशाला पुढे नेण्याचे मोठे काम केले. प्रत्येक महत्वाच्या पदावर महिलांनी काम करत देशाची सेवा केली. देशाचे सर्वोच्च पद असलेल्या राष्ट्रपती या पदावर काम करत देशाची शान वाढवली आहे. भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती हा बहुमान मिळवणाऱ्या श्रीमती प्रतिभा पाटील या भारताच्या १२ व्या राष्ट्रपती म्हणून निवडून आल्या होत्या. कायदेतज्ज्ञ असलेल्या श्रीमती प्रतिभाताई पाटील ह्या जळगाव विधानसभा मतदार संघातून आमदार म्हणून निवडून आल्या आणि त्यावेळी एस.टी. महामंडळाच्या अध्यक्षा झाल्या. पहिल्यांदाच मंत्री पदाची जबाबदारी मिळाल्यानंतर सलग वीस वर्षे त्यांनी विविध खात्याची मंत्रीपदे सांभाळून महाराष्ट्राच्या विकासात योगदान दिले. महाराष्ट्र सरकारमध्ये सार्वजनिक आरोग्य, पर्यटन, संसदीय कार्य, गृहनिर्माण, सांस्कृतिक, दारूबंदी पुनर्वसन, शिक्षणमंत्री असे मंत्रीपदे भुषवीत महाराष्ट्र विधान सभेवर तसेच महाराष्ट्र विधान मंडळ नेतेपदी त्यांची निवड झाली. श्रीमती प्रतिभाताई पाटील यांनी महिलांच्या आर्थिक विकासासाठी महिला बँकांची स्थापना केली, आदिवासी विकास योजना,वसंतराव नाईक महामंडळ, अण्णाभाऊ साठे महामंडळ आणि ज्योतिबा फुले महामंडळ इ. महामंडळांच्या स्थापनेत त्यांचे मोलाचे योगदान होते. पुढे अंध व्यक्तींसाठी सामाजिक संस्था काढून मोठे कार्य त्यांनी उभे केले. सन १९९१ साली अमरावतीतून श्रीमती प्रतिभाताई पाटील लोकसभेत खासदार म्हणून निवडून गेल्या. त्यानंतर राजस्थानच्या राज्यपाल झाल्या. देशाचे सर्वोच्च राष्ट्रपती पद त्यांनी भुषविले आणि जागतिक नकाशावर श्रीमती प्रतिभाताई पाटील यांच्या नावाने अमरावतीची नवी ओळख निर्माण झाली आहे. श्रीमती प्रतिभाताईंनी जेव्हा राजकारणात प्रवेश केला तेव्हा महिलांसाठी कोणत्याच प्रकारचे आरक्षण अस्तित्वात नव्हते. अशा परिस्थितीत त्यांनी राजकारणात दिलेले योगदान हे महिलांकरीता आजही आदर्श ठरत आहे. चुल आणि मुल एवढ्यापुरते मर्यादित न राहता समाजकारणात-राजकारणात महिलांचे योगदान हे किती महत्वाचे आहे याची प्रचिती त्यांच्या राजकारणातील योगदानावरून येते. त्यामुळेच राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील या आजवरच्या सगळ्यांत ’दयाळू’ राष्ट्रपती ठरल्या.राजकारणात आणि समाजकारणात पाऊल ठेवणाऱ्या महिलेपुढे माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचा आदर्श आहे. जागतिक पातळीवर भारताचे आणि देशपातळीवर अमरावतीची ओळख निर्माण करणाऱ्या प्रतिभाताईच्या यशस्वी राजकीय जीवनातील कार्यकाळाचा अभ्यास करावा, असे मोठे नेतृत्व अमरावतीकरांना लाभले आहे. राजकीय जीवनात महिलांनी मिळालेल्या संधीचा योग्य उपयोग केला तर “ती” देशाला आणि पर्यायाने मूळ गावाला विकासाच्यादृष्टीने उंच शिखरावर नेऊन ठेवते याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे श्रीमती प्रतिभाताई पाटील. त्यांचे नाव अमरावती विमानतळास देण्यात यावे अशी संपूर्ण अमरावतीकरांची इच्छा असून तशी त्यांनी मागणीसुद्धा केलेली आहे.
अमरावती विमानतळास भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती हा बहुमान मिळवणाऱ्या श्रीमती प्रतिभाताई पाटील यांचे नाव द्यावे – शहराध्यक्ष दीपक मानकर
Date:

