उत्तम संघटन, आर्थिक शिस्त आणि त्याचे नियोजन यावर मार्गदर्शन ; विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती
पुणे : महाराष्ट्रातील सर्व ढोल ताशा पथकांचे एकत्रीकरण करण्यासोबतच तेथील भौगोलिक परिस्थितीनुसार काही प्रश्न आहेत ते सोडवता येतील का, याचा विचार करण्याकरिता आणि पथकांवरील टीकेवर चर्चा करण्यासाठी महाराष्ट्रातील ढोल ताशा पथकांच्या पहिल्या राज्यस्तरीय अधिवेशनाचे ढोल ताशा महासंघ महाराष्ट्र च्या वतीने पुण्यात आयोजन करण्यात आले आहे. रविवार, दिनांक ४ मे २०२५ रोजी सकाळी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत बीएमसीसी कॉलेज आॅफ कॉमर्स येथील टाटा हॉल मध्ये हे अधिवेशन होणार आहे, अशी माहिती महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेला अनुप साठ्ये, विलास शिगवण, अॅड. शिरीष थिटे, ओंकार कलढोणकर, अमर भालेराव, अक्षय बलकवडे, प्रकाश राऊत आदी उपस्थित होते.
अधिवेशनाचे उद्घाटन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे हस्ते होणार आहे. तसेच समारोप केंद्रीय राज्यमंत्री खासदार मुरलीधर मोहोळ यांचे उपस्थितीत होणार आहे. या कार्यक्रमात पुणे शहरातील अनेक गणेश मंडळाचे अध्यक्ष आणि प्रतिनिधी देखील उपस्थित राहणार आहेत. ढोल ताशा वादनाचा प्रचार-प्रसार उत्तमपणे कसा होईल, यावर विचार विनिमय यावेळी करण्यात येणार आहे.
गणेशोत्सव, शिवजयंती, गुढी पाडवा या सण उत्सवांमध्ये पथके शिस्तबद्ध आणि जल्लोषपूर्ण वादन करीत असतात. या शिस्तबद्ध वादनातून सर्व सण उत्सव पवित्रपणे आणि शिस्तीत साजरा करण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात, त्यामुळे बहुतांशी युवक युवती यामध्ये सहभागी होतात. या अधिवेशनावाच्या निमित्ताने या युवक युवतींना संस्कारक्षम काही देऊ शकतो का, याचे विचार मंथन देखील यावेळी होणार आहे. पथकांवरील होणारी टीका यावरही काय उपाययोजना करता येतील याबाबतही चर्चा होणार आहे. यापूर्वी दोन वेळा ढोल ताशा वादनास राष्ट्रीय खेळाचा दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न केले आहेत, ही मागणी देखील केंद्र सरकार कडे पूर्ण ताकदीने मांडण्यात येणार आहे.
दिमडी, संबळ, नगारा, ताशा, जेंबे या वाद्यांचा तालचक्र हा कार्यक्रम सादर होणार आहे. तसेच ढोल ताशा पथकातील वादकांचे छायाचित्र प्रदर्शन आणि स्पर्धा देखील या वेळी आयोजित केले आहे. अशी विविध सत्रांची मांडणी या अधिवेशनात केली आहे. पथकांवरील टीकेवर चर्चा करण्यासाठी आप की अदालत या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. नागपूर, नाशिक, मुंबई , ठाणे , पिंपरी चिंचवड, सांगली, कोल्हापूर, सोलापूर यांसह अनेक ठिकाणच्या पथकातील दोन प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. या बरोबरच गोवा, बंगळुरू , इंदूर येथील पथके देखील सहभागी होतील.

