पुणे: ‘पुणे ते शिरूर’ या प्रस्तावित उन्नत पुलामधून वडगावशेरी मतदारसंघातील ‘फिनिक्स मॉल ते खराडी जकात नाका’ हा महत्त्वाचा पाच किलोमीटरचा भाग वगळण्यात आला होता. आमदार बापूसाहेब पठारे यांनी वाढती वाहतूक कोंडी आणि नागरी सुविधांचा विचार करून फिनिक्स मॉल ते खराडी जकात नाका या वगळलेल्या भागाचा पुन्हा समावेश करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला.
या संदर्भात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, खासदार शरदचंद्र पवार, महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री तथा पालक मंत्री अजित पवार यांच्याकडे पठारे यांनी सातत्याने पाठपुरावा केला. नवी दिल्ली तसेच नागपूर येथे नितीन गडकरी यांच्याकडे पठारे यांनी प्रत्यक्ष ४ वेळा भेटून निवदेनाद्वारे मागणी केली होती. तसेच, अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेवून पठारे यांनी वगळलेला भाग समाविष्ठ करून घेण्याची मागणी केली.
राज्य शासनाने नुकत्याच काढलेल्या शासन निर्णयानुसार, पुणे महापालिका हद्दीतील ‘फिनिक्स मॉल ते खराडी जकात नाका’ (सा.क्र. द.कि.मी. ५/८०० ते १०/८००) हा पाच किलोमीटरचा भाग देखील उन्नत पुलाच्या प्रस्तावात समाविष्ट करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
सदर निर्णयामुळे पुणे नगर रस्त्यावरील वडगावशेरी मतदारसंघातील वाहतूक कोंडी दूर होणार असून संपूर्ण ‘फिनिक्स मॉल ते शिरूर’ मार्ग सुसंगत आणि उच्च दर्जाचा होणार आहे. हे काम लवकरच सुरू होणार असून नागरिकांना याचा प्रत्यक्ष फायदा होईल, अशी माहिती आमदार बापूसाहेब पठारे यांनी दिली. या निर्णयात सहकार्य केलेल्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, खासदार शरदचंद्र पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर तसेच, एमएसआयडीसी तसेच पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचेही आमदार पठारे यांनी विशेष उल्लेख करत आभार मानले आहेत.
“झपाट्याने वाढणारी लोकसंख्या तसेच सातत्याने होणारी वाहतुक कोंडी आणि रस्त्यांवरील ताण लक्षात घेता ‘फिनिक्स मॉल ते खराडी जकात नाका’ हा भाग उन्नत पुलात समाविष्ट होणे अत्यंत आवश्यक होते. मी हा विषय सातत्याने केंद्रीय मंत्री गडकरी जी आणि राज्य पातळीवर मांडत होतो. आज शासन निर्णयाच्या माध्यमातून या भागाचा समावेश झाल्याने मतदारसंघासह परिसरातील नागरिक बांधवांचा कायमस्वरूपी वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार असल्याचे या निर्णयावर, पठारे यांनी मत व्यक्त केले.
फिनिक्स मॉल ते खराडी जकात नाका भागाचा पुणे ते शिरूर’ उन्नत पुलात समावेश; बापूसाहेब पठारे यांच्या प्रयत्नांना यश.
Date:

