सरकारच्या इशाऱ्यानुसार गुन्हा दाखल
मुंबई-मुंबई उच्च न्यायालयाने स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराला मोठा दिलासा आहे. न्यायालयाने कुणाल कामराने त्याच्यावरील गुन्हा रद्द करण्यासंबंधी दाखल केलेली याचिका सुनावणीसाठी दाखल करून घेतली आहे. तसेच ही याचिका प्रलंबित असेपर्यंत त्याला अटक न करण्याचेही आदेश दिलेत. कोर्टाच्या या आदेशामुळे कुणाल कामराला अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मुद्यावर मोठा दिलासा मिळाला आहे.
कुणाल कामराने एका स्टँडअप कॉमेडी शोमध्ये एक विडंबन केले होते. त्यात त्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नामोल्लेख टाळत त्यांना ‘गद्दार’ म्हणून हिनवले होते. या प्रकरणी त्याच्याविरुद्ध मुंबईतील खार पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी त्याला अनेकदा समन्स पाठवले. पण तो चौकशीसाठी हजर झाला नाही. त्यानंतर त्याने आपल्यावरील एफआयआर रद्द करण्यासाठी हायकोर्टात धाव घेतली होती. या याचिकेवर सुनावणी करताना हायकोर्टाने शुक्रवारी त्याची याचिका सुनावणीसाठी दाखल करून घेत याचिका प्रलंबित असेपर्यंत त्याला अटक न करण्याचे आदेश दिले.
न्यायमूर्ती सारंग कोतवाल व श्रीराम मोडक यांच्या द्विसदस्यीय खंडपीठाने या प्रकरणी ट्रायल कोर्टाला आरोपपत्राची दखल न घेण्याचे निर्देश दिलेत. एवढेच नाही तर मुंबई पोलिसांनाही आपला तपास सुरू ठेवत गरज भासली तर चेन्नईला (कामरा राहत असलेल्या विल्लुपुरमच्या जवळ) जाऊन स्थानिक पोलिसांच्या मदतीने कुणाल कामराचा जबाब नोंदवण्याचे आदेश दिलेत. आदेशाची सविस्तर प्रत अजून उपलब्ध व्हायची आहे.
उल्लेखनीय बाब म्हणजे खंडपीठाने 16 एप्रिल रोजी आपला निर्णय राखून ठेवला होता. त्यावेळी खंडपीठाने कुणाल कामराला अटकेपासून अंतरिम संरक्षण दिले होते. यावेळी कोर्टाने पोलिसांनी त्याला बजावलेल्या कलम 35(3) BNSS अंतर्गत जारी केलेल्या समन्सचाही दाखला दिला होता. या समन्सनुसार, संबंधित व्यक्तीला अटक करण्याची गरज नसल्याचे स्पष्ट होते, असे कोर्टाने म्हटले होते.
कामराचे वकील नवरोज सीरवाई यांनी यासंबंधी असा युक्तिवाद केला होता की, प्रस्तुत वादग्रस्त विनोदी क्लिप ही संविधानाच्या कलम 19(1)(अ) अंतर्गत भाषण स्वातंत्र्याच्या अंतर्गत येते. ती भाषण स्वातंत्र्याच्या अपवादाच्या कक्षेत येत नाही. त्यामुळे कामरा विरुद्ध दाखल करण्यात आलेला एफआयआर हा एका राजकीय पक्षाच्या इशाऱ्यानुसार दाखल करण्यात आला आहे. सीरवाई यांनी या प्रकरणी इम्रान प्रतापगढी विरुद्ध गुजरात राज्य खटल्याचा दाखला दिला होता. त्यात सु्प्रीम कोर्टाने भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे संरक्षण करण्याचे महत्त्व अधोरेखित केले होते. तसेच अलोकप्रिय मत व्यक्त करणाऱ्या व्यक्तींच्या अधिकारांचे समर्थन करण्यासाठी न्यायालय आणि पोलिसांना त्यांचे कर्तव्य लक्षात आणून दिले होते.
मुंबईतील खार पोलिस स्टेशनमध्ये स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यांच्याविरुद्ध 3 नवीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही प्रकरणे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत दिलेल्या वादग्रस्त विधानाशी संबंधित आहेत. 29 मार्च रोजी मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिली तक्रार जळगावच्या महापौरांनी दाखल केली आहे, तर उर्वरित दोन एफआयआर नाशिकमधील 2 वेगवेगळ्या व्यावसायिकांनी दाखल केली आहेत.
या प्रकरणात, मुंबई पोलिसांनी कुणाल कामराला चौकशीसाठी 3 समन्स बजावले आहेत. त्याचप्रमाणे, कामरा यांच्याविरुद्धची विशेषाधिकार भंगाची नोटीस महाराष्ट्र विधान परिषदेतही स्वीकारण्यात आली आहे.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणे लिहिल्यानंतर वादात सापडलेल्या विनोदी कलाकार कुणाल कामराला पोलिसांनी 31 मार्च रोजी चौकशीसाठी समन्स बजावले आहे. पोलिसांनी आतापर्यंत त्यांना दोन समन्स बजावले आहेत.
36 वर्षीय स्टँडअप कॉमेडियनने आपल्या शोमध्ये एकनाथ शिंदे यांच्या राजकीय कारकिर्दीवर टीका केली होती. कामराने ‘दिल तो पागल है’ चित्रपटातील एका गाण्याचे विडंबन केले होते. त्यात शिंदे यांना गद्दार म्हटले होते. त्याने गाण्याद्वारे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडखोरीवर विनोदी शैलीत भाष्यही केले होते. त्यानंतर शिंदे समर्थकांनी मुंबईतील द युनिकॉन्टिनेंटल हॉटेलची तोडफोड केली. कुणालचा कार्यक्रम याच हॉटेलमध्ये झाला होता.
कामराचा व्हिडिओ समोर आल्यानंतर, 23 मार्चच्या रात्री, शिवसेना शिंदे गटाच्या समर्थकांनी मुंबईतील खार परिसरातील हॅबिटॅट कॉमेडी क्लबची तोडफोड केली. शिंदे म्हणाले, ‘याच व्यक्तीने (कामरा) सर्वोच्च न्यायालय, पंतप्रधान, अर्णब गोस्वामी आणि काही उद्योगपतींवर भाष्य केले होते. हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही. ते एखाद्यासाठी काम करण्याबद्दल आहे.”
दरम्यान, कुणाल कामरा यांनी शिंदेंबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल माफी मागणार नसल्याचे सांगितले आणि मुंबईतील ज्या ठिकाणी कॉमेडी शो रेकॉर्ड करण्यात आला त्या ठिकाणी झालेल्या तोडफोडीची टीका केली.

