पाकिस्तान म्हणाला- जर सिंधूचे पाणी थांबवले तर ते ॲक्ट ऑफ वॉर ठरेल,भारताच्या पाच मोठ्या निर्णयानंतर पाकिस्तानची व्यापार बंदीची घोषणा,अन केल्या पाच घोषणा
पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तालयाबाहेर जमावाने घातला गोंधळ
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने घेतलेल्या कठोर निर्णयांना प्रत्युत्तर म्हणून, पाकिस्तानने दोन्ही देशांमधील सर्व द्विपक्षीय करार स्थगित करण्याची चर्चा केली आहे. यामध्ये १९७२ च्या शिमला कराराचाही समावेश आहे. आज झालेल्या राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या (NCS) बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.या बैठकीनंतर काही वेळातच, पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमधील भारतीय उच्चायुक्तालयाबाहेर जमावाने गोंधळ घातला, काही लोकांनी गेटवरून उडी मारण्याचा प्रयत्न केला आणि भारतविरोधी घोषणा दिल्या.
पाकिस्तानमधील राष्ट्रीय सुरक्षा समितीची बैठक पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या अध्यक्षतेखाली झाली. एक दिवस आधी, भारताने सिंधू पाणी करार पुढे ढकलण्यासह 5 मोठे निर्णय घेतले होते.जर भारताने सिंधू पाणी करार थांबवला तर तो ॲक्ट ऑफ वॉर म्हणजेच युद्धाचा गुन्हा मानला जाईल, असे पाकिस्तानने म्हटले आहे. पाकिस्तानच्या सार्वभौमत्वाला आणि सुरक्षेला येणाऱ्या कोणत्याही धोक्याला सर्व प्रदेशात जोरदार प्रत्युत्तर दिले जाईल, असे पाकिस्तानने म्हटले आहे. आम्ही कोणत्याही दहशतवादी कारवायांचा निषेध करतो.पाकिस्तानी वृत्तपत्र ‘डॉन’च्या वृत्तानुसार, एनसीएसच्या बैठकीत असे म्हटले गेले की वक्फ विधेयक भारतात जबरदस्तीने मंजूर करण्यात आले आहे, हा मुस्लिमांना बाजूला ठेवण्याचा प्रयत्न आहे.
भारताच्या पाच मोठ्या निर्णयानंतर पाकिस्तानची व्यापार बंदीची घोषणा,अन केल्या पाच घोषणा
पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये 26 पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला आहे. दहशतवादाविरोधात आता भारताने कठोर पाऊले उचलायला सुरूवात केली आहे. भारताने पाकिस्तानी नागरिकांसाठी व्हिसा बंद केला. तसेच 48 तासांमध्ये पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचा आदेश दिला. त्यावर पाकिस्ताननेही भारताविरोधात सहा निर्णय घेतले आहेत.
सर्व भारतीय मालकीच्या किंवा भारतीय संचालित विमान कंपन्यांसाठी पाकिस्तानचे हवाई क्षेत्र तात्काळ बंद करण्याचा निर्णय पाकिस्तानने घेतला आहे. तसेच अटारी वाघा बॉर्डर पोस्ट तात्काळ बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतासोबत होणारा व्यापारही बंद करण्याचा निर्णय पाकिस्तानने घेतला आहे.
पाकिस्तानने कोणते निर्णय घेतले?
भारतासोबत सुरू असलेला व्यापार बंद. भारताच्या माध्यमातून इतर कोणत्याही देशासोबत व्यापार नाही
भारतीयांचा सार्क व्हिसा रद्द करणार.
भारतीय उच्चायुक्तालयातील लष्कर सल्लागारांना भारतात परतावं लागणार.
वाघा अटारी बॉर्डर बंद.
इस्लामाबादमधील भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांची संख्या 30वर आणणार.
भारतीय विमानांसाठी पाकिस्तानी एअरस्पेस बंद.
पाकिस्तानविरुद्ध भारताचे निर्णय
सिंधू पाणी करार स्थगित .
पाकिस्तानी नागरिकांसाठी भारतीय व्हिसा बंद .
पाकिस्तानी दूतावासातील आकार कमी करण्याचा आदेश.
अटारी वाघा बॉर्डर 1 मे पर्यंत बंद राहणार .
भारतातील पाकिस्तानी उच्चायुक्तालय बंद .
मोदींचा दहशतवाद्यांना इशारा
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यावर पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदा जाहीर भाष्य केलं. हा हल्ला करून भारतीय आत्म्यावरच हल्ला करण्याचं दुःसाहस करणाऱ्या दहशतवाद्यांना जोरदार दणका मिळेल, कल्पनाही करता येणार नाही अशी शिक्षा दहशतवाद्यांना देण्यात येईल असं मोदींनी ठणकावलं. बिहारच्या मधुबनी इथे सभेत बोलताना पंतप्रधान मोदींनी ही गर्जना केली. दहशतवाद्यांची उरली सुरली आश्रयस्थानंही नष्ट करण्याची वेळ आली आहे असं मोदी म्हणाले.
भारतातून पाकिस्तानात कोणता माल पाठवला जातो?
दैनंदिन जीवनात उपयोगी पडणाऱ्या विविध प्रकारची फळे आणि भाजीपाला अशा अनेक प्रकारच्या खाद्यपदार्थांची भारतातून पाकिस्तानात निर्यात केली जाते. यामध्ये बटाटे, कांदे आणि लसूण यांचा समावेश आहे. तसेच डाळ, हरभरा आणि बासमती तांदूळही भारतातून पाकिस्तानात पाठवले जातात. याशिवाय पाकिस्तान भारतातून आंबा, केळी यांसारखी अनेक हंगामी फळे आयात केली जातात.
भारतीय चहा जगभरात प्रसिद्ध, पाकिस्तानात मोठी निर्यात
भारतीय चहा जगभरात प्रसिद्ध आहे. आसाम आणि दार्जिलिंगमधून सुगंधित चहाची पानेही पाकिस्तानात पाठवली जातात. याशिवाय भारत पाकिस्तानला मिरची, हळद, जिरे असे विविध प्रकारचे मसाले पाठवतो. यासोबतच भारतातून पाकिस्तानला निर्यात होणाऱ्या इतर वस्तूंमध्ये सेंद्रिय रसायने, औषधी, साखर आणि मिठाई यांचा समावेश होतो.
पाकिस्तानातून भारतात काय येते?
पाकिस्तानातून भारतात येणाऱ्या वस्तूंमध्ये सिमेंट, रॉक सॉल्ट, मुलतानी माती, कापूस, चामडे, काही वैद्यकीय उपकरणांचा समावेश आहे. याशिवाय पेशावरी चप्पल आणि लाहोरी कुर्तेही पाकिस्तानातून भारतात आयात केले जातात.
अटारी मार्ग हा पाकिस्तानसाठी एकमेव जमीन व्यापार मार्ग
अमृतसरपासून अवघ्या 28 किलोमीटर अंतरावर असलेले अटारी हे भारतातील पहिले लँड पोर्ट आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील व्यापार अटारी-वाघा सीमेवरून होतो, त्यामुळे 120 एकरांवर पसरलेला आणि थेट राष्ट्रीय महामार्ग-1 शी जोडलेला हा चेक पॉईंट व्यापारात, विशेषतः अफगाणिस्तानमधून होणाऱ्या आयातीत महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
अटारी-वाघा कॉरिडॉरवरील व्यापाराची स्थिती काय?
अटारी-वाघा कॉरिडॉरवरील व्यापारात गेल्या काही वर्षांत अनेक चढ-उतार झाले आहेत. जेथे 2017-18 आणि 2018-19 मध्ये व्यापार सुमारे 4100-4300 कोटी रुपयांचा होता. त्याच वेळी, ते 2019-20 मध्ये 2772 कोटी रुपये आणि 2020-21 मध्ये 2639 कोटी रुपयांपर्यंत खाली आले. 2022-23 मध्ये, व्यापार आणखी घसरला आणि फक्त 2257.55 कोटी रुपये राहिला. तर 2023-24 मध्ये मोठी झेप घेत दोन्ही देशांमधील व्यापार 3886 कोटी रुपयांपर्यंत वाढला. 2023-24 मध्ये या मार्गावरून 6,871 ट्रकने प्रवास केला आणि 71,563 प्रवाशांच्या येजा केल्याच्यी नोंद झाली आहे.

