पुणे : पुण्यातील चंदननगर येथील झोपडपट्टीमध्ये बुधवार (दि.२३) रोजी लागलेल्या भीषण आगीत ९० हन अधिक कुटुंबांचे संसार उद्ध्वस्त झाले असून, शेकडो नागरिक उघड्यावर आले आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार, जिल्हाधिकारी, पुणे मनपा आयुक्त यांना त्वरीत मदत आणि पुनर्वसनाच्या उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
डॉ. गोऱ्हे यांनी म्हटले आहे की, बुधवारी पहाटे चंदन नगर येथील सुंदराबाई मराठे शाळेच्या बाजूला असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर वस्तीमध्ये आग लागली होती. या आगीत ९० हून अधिक झोपड्या जळाल्याचे प्राथमिक दिसून येत आहे.
यात अनेकांचे कुटुंब उघड्यावर आले असून त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. आगीत झालेल्या नुकसानीचा तत्काळ पंचनामा करून नुकसानग्रस्तांना भरपाई देण्याची, तात्पुरत्या निवाऱ्याची, अन्न-पाण्याच्या पुरवठ्याची, तसेच दीर्घकालीन पुनर्वसन करण्याची मागणी डॉ. गोऱ्हे यांनी केली आहे. तसेच, भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी झोपडपट्टी भागातील वीज व गॅससारख्या मूलभूत सुविधांमध्ये सुधारणा करून अग्निसुरक्षा उपाययोजना राबवण्याचे आवाहनही केले आहे.
“या घटनेची तातडीने दखल घेऊन शासनाने नागरिकांच्या सुरक्षेसाठी पावले उचलावीत,” असे स्पष्ट मत डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केले आहे.

