
पुणे:येथील कोंढव्यातील कौस्तुभ गणबोटे आणि कर्वे न गरचे संतोष जगदाळे यांच्या पहलगाम येथील आतंकी हल्ल्यातील हत्येने या दोन्ही कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
कर्वेनगर येथील गल्ली क्रमांक 02 मधील ज्ञानदीप सोसायटीत राहणारे जगदाळे कुटुंब. एकाच इमारतीत तिघे भाऊ आनंदात राहत होते. यामधील सर्वात लहान असणारा संतोष जगदाळे हे आपली पत्नी व मुलगी व त्यांचा मित्र कौस्तुभ गणबोटे व त्यांची पत्नी असे एकूण पाच जण जम्मू-काश्मीरला सुट्टीचा आनंद घेण्यासाठी तीनच दिवसापूर्वी गेले होते.मात्र कालच्या अतिरेकी हल्ल्याने त्यांच्या आनंदावर विरजन पडले.
संतोष जगदाळे यांना गोळ्या लागल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला होता. तेथील रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले. त्यांची पत्नी प्रगती संतोष जगदाळे, मुलगी आसावरी संतोष जगदाळे या सुखरूप आहेत.
जगदाळे कुटुंबीय तीन दिवसांपूर्वी एका खासगी कंपनीशी संबंधित गटासोबत काश्मीरला गेले होते. नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, संतोष जगदाळे हे एक सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपनीत काम करतात. हे कुटुंब त्यांच्या बंगल्याच्या तळमजल्या राहतात. तर पहिल्या मजल्यावर संतोष यांचा भाऊ अविनाश व आई राहतात. त्यांचा दुसरा भाऊ अजय याच इमारतीत राहतात.
संतोष गेल्याने या जगदाळे कुटुंबावरती दुःखाचा डोंगर कोसळला आहे. हसता खेळणारा माणूस तसेच कुटुंबातील कर्ता व्यक्ती गेल्याने घरावर शोककळा पसरली आहे. संतोष यांना बाहेर फिरण्याची मोठ्या प्रमाणात आवड होती. काही दिवसांपूर्वीच त्यांनी अरुणाचल प्रदेशाचा दौराही केला होता.
मिळालेल्या माहितीनुसार संतोष जगदाळे यांना बुधवारी रात्री सव्वा अकरा वाजता पुणे विमानतळावरती आणण्यात येणार आहे. तेथून रात्रभर रुग्णालयातील शीतगृहात ठेवण्यात येणार आहे. गुरुवारी सकाळी सात ते साडे सातच्या दरम्यान कर्वेनगर येथील त्यांच्या घरी दर्शनासाठी नेण्यात येणार आहे.
गुरुवारी नऊ वाजता राहत्या घरापासून त्यांची अंत्ययात्रा निघणार असून वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती संदीप खर्डेकर यांनी त्यांच्या नातेवाईकांना विचारून दिली आहे.
कोंढव्यातील साईनगर भागातील व्यावसायिक कौस्तुभ गणबोटे हे शनिवारी (ता. १९) पुण्यातून विमानाने जम्मू-काश्मीर येथे पर्यटनासाठी गेले होते. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी, मित्र संतोष जगदाळे हे देखील होते.
काश्मीर खोऱ्यातील पहेलगामच्या बैसरण घाटी भागात दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला. त्यामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या अकाली जाण्याने नातेवाईकांत आणि मित्र परिवारात मनमिळावू व्यक्ती गेल्याची भावना निर्माण झाली आहे.
कौस्तुभ यांचा मागील तीस वर्षांपासून गणबोटे फरसाण हाऊस या नावाने व्यवसाय आहे. अगदी छोट्याशा व्यवसायातून त्यांनी गणबोटे फरसाण हाऊस हा व्यवसाय नावारूपाला आणला होता. कौस्तुभ यांना एक मुलगा असून त्याचा विवाह दोन वर्षांपूर्वीच झाला होता. अतिशय प्रेमळ व मनमिळाऊ स्वभावाचे म्हणून त्यांची ओळख होती.
त्यांच्या अशा अकाली जाण्याने मित्रपरिवार व कुटुंबावर शोककळा पसरली आहे. त्यांचा मृतदेह आज विमानाने रात्री बाराच्या सुमारास पुण्यात आणण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांकडून मिळाली आहे. त्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
गोळीबार सुरु होता तेव्हा संतोष आणि कौस्तुभ व इतर पर्यटक हॉटेलबाहेर बसले होते. गोळीबाराचा आवाज झाल्याने आरडाओरड सुरु झाली. पर्यटक धावपळ करू लागले, त्यामुळे दहशतवाद्यांनी लांबूनच पर्यटकांच्या दिशेने गोळीबार केला. त्यात संतोष यांच्या खांद्याजवळ तर कौस्तुभ यांच्या कमरेच्या खाली गोळी लागुन गेली.
गोळीबारानंतर सुरुवातीला धावपळ सुरू होती. कौस्तुभ यांचा त्यांच्या पत्नीने शोध घेतल्यानंतर ते जखमी अवस्थेत मिळून आले. त्यांचा मुलगा कुणाल हा कौस्तुभ यांच्यावर झालेल्या हल्ल्याची माहिती मिळताच पुण्यातून त्यांच्याकडे विमानाने रवाना झाला आहे.
कौस्तुभ यांना मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत होता. शुगरचा त्रास असल्याने रक्त थांबत नव्हते. तर, जवळच असणारे संतोष यांनाही मोठ्या प्रमाणात जखम झाल्याने कौस्तुभ घाबरून गेले. गोळी लागल्यानंतर जवळपास अर्धा तास त्यांना मदत मिळाली नाही.

