पुणे – नागरिकांच्या मागणीनुसार औंध येथील जलतरण तलाव लवकरच खुला केला जाईल, असे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी आज (बुधवारी) सांगितले.छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघातील औंध भागातील महापालिकेचा जलतरण तलाव बंद आहे, अशी तक्रार औंध मधील नागरिकांनी वारंवार केली होती. तसेच तलाव बंद असल्याने जलतरणाचा सराव करता येत नाही, त्यामुळे गैरसोय होते, असे खेळाडूंचे म्हणणे होते. त्याची दखल घेऊन महापालिकेच्या क्रीडा विभागाच्या उपायुक्त किशोरी शिंदे यांच्या समवेत आमदार शिरोळे यांनी बैठक घेतली. त्या बैठकीत छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील जलतरण तलावांच्या स्थितीचा आढावा घेण्यात आला.
औंध येथील जलतरण तलाव लवकरात लवकर सुरू करण्यात यावा, अशी मागणी आमदार शिरोळे यांनी केली. जलतरण तलावाचा डागडुजीचा आढावा घेतला व किरकोळ कारणामुळे बंद असलेले अन्य तलाव लवकरात लवकर सुरू करावेत, असे आमदार शिरोळे यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.
जलतरण तलावात शिकण्यासाठी येणाऱ्या किंवा सरावासाठी येणाऱ्यांच्या सुरक्षेकरीता लाईफ गार्ड किती आहेत, तसेच पाण्याची स्वच्छता आणि अन्य उपाययोजना या विषयीची माहिती आमदार शिरोळे यांनी घेतली.

