रस्त्यावरच्या सडकछाप व्यक्तीने करावे, असे हे आरोप आहेत. त्यांच्याकडे कुठला पुरावे आहे. एखादा राजकीय पक्षाविरोधात असे गंभीर आरोप करणे म्हणजे माधव भंडारी यांच्या अकलेचे दिवाळे निघाले आहे, अशा शब्दात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी भंडारी यांच्या आरोपावर पलटवार केला आहे.
उतारवयात विधानपरिषदेवर संधी न मिळाल्याने त्यांच्या डोक्यावर परिणाम झालाय. त्यांच्या उपचारासाठी काही सहकार्य लागलं तर राष्ट्रवादी तन-मन-धनाने भंडारींना सहकार्य करणार आहे, असे म्हणत अमोल मिटकरी यांनी माधव भंडारींवर बोचरी टीका केली. भंडारींना पक्षात कोणीच विचारत नाहीय. ते आऊटडेटेड झालेली बॅटरी असल्याचा टोला देखील मिटकरी यांनी लगावला आहे.
मुंबईवरील 26/11 च्या तत्कालीन सत्ताधारी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचा हात असल्याचा खळबळजनक आरोप भाजप नेते माधव भंडारी यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ माजली आहे. काँग्रेसने माधव भंडारी एक सडकछाप व्यक्ती असल्याचा आरोप करत या प्रकरणी भाजपवर जोरदार पलटवार केला आहे.माधव भंडारी यांच्या हस्ते पुण्यात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉक्टर नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणी निर्दोष सुटका झालेल्या विक्रम भावे यांच्या ‘दाभोळकर हत्या व मी’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. यावेळी बोलताना त्यांनी उपरोक्त आरोप केला. मुंबई शहरावर झालेल्या 26/11 च्या हल्ल्यात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचा हात होता. मुंबईवर हल्ला होणार याची कल्पना सर्वांना होती. स्थानिक प्रशासनावर प्रभाव असलेल्या व्यक्तीच्या सहभागाशिवाय एवढा मोठा हल्ला होणे अशक्य आहे. नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे, गौरी लंकेश व एम एम कलबुर्गी या हत्याकांडाद्वारे हिंदुत्त्ववादी संघटना मोडीत काढण्याचे षडयंत्र रचण्यात आले.
नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्या प्रकरणात शरद कळसकर व सचिन अंदुरे यांना शिक्षा झाली. पण या प्रकरणी ते निर्दोष आहेत. त्यांची सुटका होईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, असे माधव भंडारी म्हणाले.
माधव भंडारी यांनी यावेळी गुजरात दंगलीपासून हिंदुत्वाला बदनाम करण्याचे काम सुरू असल्याचाही आरोप केला. भारतात गुजरात दंगलीपासून हिंदुत्वाला बदनाम करण्याचे काम सुरू आहे. देशात राजकीय बदल झाल्यानंतर व्यवस्थेमुळे हिंदुत्त्ववादी संघटनांना बदनाम केले जात आहे. कारण, व्यवस्था म्हणजे पोलिस, महसूल, न्यायव्यवस्था तीच आहे. ही व्यवस्था बदलण्याचे मोठे आव्हान आहे, असे ते म्हणाले.

