मुंबई- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मनसे प्रमुख राज ठाकरे हे दोघे भाऊ महाराष्ट्र हितासाठी टाळी देणार अशी चर्चा सुरू आहे. यात मनसे आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये वाकयुद्ध रंगले आहे. तर आता मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्ते आणि नेत्यांना उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीबाबत बोलू नका अशा सूचना दिल्या आहेत.राज ठाकरे हे सध्या परदेशात आहे. ते महाराष्ट्रात परतल्यानंतर मनसे-उबाठाच्या एकत्रित येण्यावर सविस्तर बोलतील. तोपर्यंत युतीच्या मुद्द्यावर कुणीही बोलू नये. संवेदनशील विषयावर बोलणे टाळा असा थेट आदेश राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना दिला आहे, असे वृत्त एका मराठी वृत्त वाहिनीने दिले आहे.
मनसेचे नेते यशवंत किल्लेदार म्हणाले होते की, महाराष्ट्रासाठी एकत्र येत असाल तर अटी-शर्ती कशाला घालता? जेव्हा एक मनाने एक दिलाने महाराष्ट्र पुढे जाऊ, तेव्हा सर्व काही बाजूला पडलेले असेल!.मनसेचे नेते अमेय खोपकर म्हणाले की, अशी अभद्र युती होऊ नये हीच ईश्वर चरणी प्रार्थना, असे म्हटले होते. तर संदीप देशपांडेंनी म्हटले की, तू इतक्या जागा लढव, मी तितक्या लढवतो, तू ही जागा लढव, मी ही जागा लढवतो, तुला हे पद, मला हे पद, इतका मर्यादित विचार करून चालणार नाही. फक्त निवडणूक एवढाच विचार केला तर ती वैचारिक दरिद्रता असेल.संदीप देशपांडेंनी उद्धव ठाकरे यांच्या अटीचा उल्लेख करत म्हटले की, त्यांनी भाजपला धोका दिला, आता पवारांनाही देतील, मनसेने त्यांच्यावर विश्वास कसा ठेवायचा, असा सवाल विचारला होता. तर संजय राऊत यांनी, महाराष्ट्रद्रोही कोण हे राज ठाकरे यांना कळणार नसले तर त्यांच्यासाठी प्रशिक्षण वर्ग सुरु करावा लागेल, असा टोला लगावला होता.
संजय राऊत म्हणाले की, राज ठाकरेंच्या मनात काही विचार पक्के असल्याशिवाय त्यांनी एकत्र काम करण्याची इच्छा व्यक्त केली नसती, हे जर त्यांच्या पदाधिकाऱ्यांना कळत नसेल तर मी काय बोलणार. जेव्हा उद्धव ठाकरेंनी ही भूमिका मांडली तेव्हा आमच्या शिवसैनिकांना स्पष्ट संदेश दिला आहे.
राज ठाकरे म्हणाले की, एकत्र येणे आणि एकत्र राहणे फार कठीण आहे असे मला वाटत नाही. प्रश्न फक्त इच्छाशक्तीचा आहे. हा माझ्या वैयक्तिक इच्छेचा किंवा स्वार्थाचा विषय नाही. मला वाटते की आपण महाराष्ट्राचे मोठे चित्र पाहिले पाहिजे. माझा असा विश्वास आहे की महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांमधील मराठी लोकांनी एकत्र येऊन एक पक्ष स्थापन केला पाहिजे.
उद्धव ठाकरे म्हणाले की, अगदी किरकोळ भांडणे बाजूला ठेवायला मी देखील तयार आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठीसाठी एकत्र येण्याचे आवाहन करतो. महाराष्ट्राचे हित मग त्याच्या आड जो कुणी येईल त्याला मी घरी बोलवणार नाही, त्याच्या घरी जाणार नाही त्याचे स्वागत करणार नाही हे आधी ठरवा. मग महाराष्ट्राच्या हिताच्या गोष्टी करा. बाकी आमच्यातली भांडणे नव्हतीच पण जी काही होती ती मिटवून टाकली चला. त्यावेळी सगळ्या महाराष्ट्राने ठरवायचे की भाजपाबरोबर जायचं की माझ्याबरोबर.

