पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील सनदी अधिकाऱ्यांना 21 एप्रिल, 2025 रोजी 17व्या सनदी सेवा दिनानिमित्त संबोधित करतील. या समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी सार्वजनिक प्रशासनातील उत्कृष्टतेबद्दल दिले जाणारे पंतप्रधान पुरस्कार देखील प्रदान करतील. केंद्र, राज्य सरकारांच्या तसेच जिल्हा प्रशासनात विशिष्ट प्राथमिकता कार्यक्रम तसेच नवोन्मेष प्रभावी पद्धतीने राबवण्यासाठी हे पुरस्कार दिले जातात. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वंकष विकास व नवोन्मेषाबद्दलच्या इ- पुस्तकाचे अनावरण करतील. यात विशिष्ट प्राथमिकता कार्यक्रम तसेच नवोन्मेष प्रभावी पद्धतीने राबवणाऱ्यांच्या यशोगाथा समाविष्ट असतील. पुरस्कार विजेत्या उपक्रमांवर आधारित एक चित्रफीत देखील यावेळी दाखवली जाईल.
राष्ट्रीय सनदी सेवा दिनाला संबोधित करण्याची पंतप्रधानांची ही सातवी वेळ आहे. सनदी अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या सेवेसाठी स्वतःला पुनर्समर्पित करण्यासाठी व लोकसेवेप्रती तसेच कामातील उत्कृष्टतेप्रती वचनबद्धतेचे स्मरण करण्यासाठी हा सनदी सेवा दिन साजरा केला जातो. सरदार वल्लभभाई पटेल यांनी 1947 साली दिल्लीतल्या मेटकाफ हाऊस इथे प्रशासनिक सेवेच्या प्रशिक्षणार्थींना संबोधित केले होते, याच्या स्मरणार्थ या दिवसाची निवड केली गेली आहे. सनदी सेवा दिना निमित्ताने सरकारने नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे दिवसभराची सनदी सेवा दिन परिषद आयोजित केली आहे.
पंतप्रधान सार्वजनिक प्रशासन उत्कृष्टता पुरस्कारांद्वारे जिल्हास्तरावरील व केंद्र तसेच राज्यस्तरावरील संस्थांनी सामान्य नागरिकांच्या कल्याणासाठी केलेल्या नवोन्मेषपूर्ण व असाधारण कामाची दखल घेतली जाईल. पंतप्रधान पुरस्कार 2024 साठीच्या योजनेत खालील प्राधान्य कार्यक्रमांची नोंद ‘सनदी सेवा दिन 2025’ च्या कार्यक्रमात दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांसाठी घेतली जाईल.
अ) श्रेणी 1: जिल्ह्यांचा सर्वांगीण विकास
ब) श्रेणी 2: आकांक्षी ब्लॉक कार्यक्रम
क) श्रेणी 3: नवोन्मेष
सर्वसमावेशक मूल्यमापनानंतर 1588 नामांकनांमधून 14 पुरस्कार विजेत्यांची निवड करण्यात आली आहे. पंतप्रधान पुरस्कारात सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, व रुपये 20 लाखाची प्रोत्साहन रक्कम असते, व पुरस्कार विजेत्या जिल्हा अथवा संस्थेने ती रक्कम एखाद्या सार्वजनिक कल्याणाच्या उपक्रमात साधनसंपत्तीची कमतरता पूर्ण करण्यासाठी वापरण्याची अपेक्षा असते.
पुरस्कार वितरण कार्यक्रमानंतर ‘सनदी सेवा सुधारणा-आव्हाने व संधी’ या विषयावर कॅबिनेट सचिव डॉ. टी. व्ही. सोमनाथन यांच्या अध्यक्षतेखाली एक चर्चासत्र होईल.
याशिवाय पुढील विषयांवर चार सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे:- शहरी वाहतूक बळकटीकरण, आयुष्मान भारत पंतप्रधान – जन आरोग्य योजना व आयुष्मान आरोग्य मंदिर यांच्या माध्यमातून स्वस्थ भारत साठी प्रोत्साहन, सक्षम अंगणवाडी मोहीम व पोषण 2.0 अभियान मार्फत महिला व बालकांच्या पोषक आहाराला प्रोत्साहन, आकांक्षीत ब्लॉक कार्यक्रम.
‘शहरी वाहतूक बळकटीकरण’ या सत्राच्या अध्यक्षस्थानी गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्री तसेच ऊर्जामंत्री मनोहर लाल असतील, ‘आयुष्मान भारत पंतप्रधान – जन आरोग्य योजना व आयुष्मान आरोग्य मंदिर यांच्या माध्यमातून स्वस्थ भारत साठी प्रोत्साहन’ या सत्राच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तसेच रसायन व खते मंत्री जगत प्रकाश नड्डा असतील, ‘सक्षम अंगणवाडी मोहीम व पोषण 2.0 अभियान मार्फत महिला व बालकांच्या पोषक आहाराला प्रोत्साहन’ या सत्राच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय महिला व बालविकास मंत्री अन्नपूर्णादेवी असतील आणि ‘आकांक्षीत ब्लॉक कार्यक्रम’ या सत्राच्या अध्यक्षस्थानी नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. व्ही. आर. सुब्रह्मण्यम असतील.
सचिव, अतिरिक्त सचिव, संयुक्त सचिव, उप सचिव, सह सचिव आणि भारत सरकारचे इतर अनेक वरिष्ठ अधिकारी तसेच राज्य सरकारांचे मुख्य सचिव, अतिरिक्त मुख्य सचिव, प्रिन्सिपल सचिव, केंद्रीय प्रशिक्षण संस्थांचे प्रमुख, निवासी आयुक्त, केंद्रीय सेवांचे अधिकारी आणि जिल्हाधिकारी या दिवसभराच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

