पद्मश्री दादा उर्फ भिकू रामजी इदाते यांचे मत : जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन पदग्रहण समारंभ
पुणे: वैद्यकीय विकास मोठ्या प्रमाणात झालेला दिसून येतो, परंतु हा विकास खेड्यापाड्यातील, दरी खोऱ्यातील आदिवासी पाड्यापर्यंत आजही पोहोचला नाही. त्यांच्या आरोग्याचे प्रश्न कसे सोडविणार. वसुधैव कुटुम्बकम असे आपण म्हणतो परंतु त्या कुटुंबाचे आपण काय करायचे. देश धर्म आणि संस्कृती सुस्थितीत राहण्यासाठी समाज सुदृढ असायला पाहिजे, असे मत पद्मश्री भिकू रामजी इदाते यांनी व्यक्त केले.
जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचा पदग्रहण समारंभ टिळक रस्त्यावरील नीतू मांडके सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरोलॉजी पुणेचे संचालक डॉ.नवीन कुमार, संघटनेच्या मावळत्या अध्यक्ष डॉ.शुभदा जोशी, नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. सुनिल भुजबळ, सचिव डॉ. भाग्यश्री मुनोत- मेहता तसेच विविध वैद्यकीय संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
सन २०२५ – २०२६ या वर्षासाठी अध्यक्ष म्हणून डॉ. सुनिल भुजबळ, उपाध्यक्ष डॉ. अप्पासाहेब काकडे, खजिनदार डॉ.संदीप निकम, सचिव डॉ. भाग्यश्री मुनोत-मेहता, डॉ.राजेश दोशी, सहसचिव डॉ.दीपक गांधी, डॉ.सिद्धार्थ शिंदे यांची निवड झाली आहे.
डाॅ. नवीन कुमार म्हणाले, कोविड-१९ नंतर जगात अनेक गोष्टींमध्ये मोठे बदल झाले आहेत. आज २०२५ मध्ये १५ हजारपेक्षा अधिक विषाणू आहेत आणि २३४ विषाणू कुटुंबांची नोंद आहे, आणि प्रत्येक वर्षी तीनशे ते चारशे नवीन विषाणू निर्माण होत आहेत. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरोलॉजी सारख्या ४ इन्स्टिट्यूट भारताच्या विविध भागात स्थापन करण्यात येणार आहेत. जर आपण देशात होणाऱ्या संसर्गजन्य आजारांवर नियंत्रण आणायचे ठरवले तर ते शक्य नाही, यासाठी एकत्रित आणि एकसूत्री दृष्टिकोन असणे गरजेचे आहे. आपण विषाणूंना प्रतिबंध करू शकत नाही, परंतु नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरोलॉजी च्या माध्यमातून त्यांचा प्रतिकार करण्यासाठी आपण तयार आहोत.
डॉ. सुनिल भुजबळ म्हणाले, आजारांना प्रतिबंध करा, संरक्षण करा आणि आरोग्य संस्कृतीला प्रोत्साहन द्या, हे ब्रीदवाक्य घेऊन यंदाच्या वर्षी जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन काम करणार आहे. डॉक्टरांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी यासोबतच सामाजिक आरोग्य जनजागृतीसाठी शिबिरे यांसह विविध सामाजिक उपक्रम यंदा राबविण्यात येणार आहेत. डॉ. भाग्यश्री मुनोत मेहता यांनी सूत्रसंचालन केले.

